ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामधील वादाचे केंद्रबिंदू ठरलेले डोंबिवलीचे माजी नगरसेवक महेश पाटील नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला पोहोचले. महेश पाटील हे शिवसैनिक होते. परंतु महेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले होते. राज्यातील महायुतीवर त्याचे परिणाम दिसू लागल्यानंतर या दोन पक्षांमध्ये प्रवेश बंदीचा तह झाल्याची चर्चा सुरु होती. महेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता महेश पाटील यांचे नेमके काय होणार अशाही चर्चा रंगल्या आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन शिंदे गटाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरु केला होता. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या विषयी कमालीची नाराजी होती. शिंदे गटाचे आमदार चव्हाण यांच्यावर टीका करत होते. फोडाफोडीमुळे अस्वस्थ झालेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. महायुतीत सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाची तक्रार घेऊन हे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘सुरुवात कोणी केली’ अशा शब्दांत शिंदे यांच्या मंत्र्यांना सुनावले होते.
डोंबिवलीचे माजी नगरसेवक महेश पाटील यांना भाजपने पक्षात घेतल्यामुळे राज्यातील महायुतीतील शिंदे गट आणि भाजपमधील अंतर ताणले गेले होते. राज्यातील महायुतीवर त्याचे परिणाम दिसू लागल्यानंतर या दोन पक्षांमध्ये प्रवेश बंदीचा तह झाल्याची चर्चा सुरु होती. त्यानुसार, शिंदे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजीत थरवळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमधील प्रवेश देखील स्थगित झाला.
फडणवीस आणि महेश पाटील भेट
नागपूर येथे अधिवेशन सुरु असतानाच माजी नगरसेवक महेश पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांच्यामध्ये दीर्घ चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना उभे आव्हान देत महेश पाटील हे तीन माजी नगरसेवकांसह भाजपामध्ये गेले होते. शिंदे आणि भाजपमध्ये पुन्हा सलगीचा वातावरण दिसू लागल्यावर भाजप प्रवेश केलेल्या अनेकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महेश पाटील यांना नागपूर मध्ये बोलावून घेत भाजप त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कळते आहे.
