अंबरनाथ, बदलापूर रेल्वे वाहतुकीवर परिणाम; रेल्वेचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकावरून पुणे आणि त्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अंबरनाथ किंवा बदलापूर रेल्वे स्थानकात मेल-एक्स्प्रेसला थांबा द्या, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र ही मागणी व्यावहारिक नसून इतर सेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे, स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

नोकरदारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात नोकरदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसोबतच तळेगाव, चिंचवड, पुणे या भागात नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. या प्रवाशांना कल्याण स्थानकातून मेल, एक्स्प्रेस गाडय़ा मिळतात. बहुतेक वेळा कल्याण स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी कर्जत स्थानकातून एक्स्प्रेस पकडतात. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत व कल्याण असा प्रवास टाळण्यासाठी बदलापूर किंवा अंबरनाथ रेल्वे स्थानकातच एखाद्या प्रवासी एक्स्प्रेसला थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांची आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे अर्ज विनंत्याही केल्या आहेत. मात्र अंबरनाथ किंवा बदलापूर रेल्वे स्थानकात एखाद्या एक्स्प्रेस वा मेलला थांबा देणे अशक्य असल्याचे मत रेल्वे प्रशासनाने व्यक्त केले आहे.

भौगोलिक रचना अडचणीची

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदलापुरातील प्रवाशांशी संवाद साधला होता. त्यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या नोकरदारांच्या सोयीसाठी एखाद्या एक्स्प्रेसलाही येथे थांबा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र ही मागणी व्यवहार्य नसल्याचे  रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दोन्ही स्थानकांच्या भौगोलिक रचनेमुळे मेल एक्स्प्रेसच्या रुंदीइतके फलाट बांधता येणे अशक्य आहे. तसेच येथे एक्स्प्रेसना थांबा देण्यासाठी काही किलोमीटरपासून वेग कमी करत स्थानक गाठावे लागेल. त्यासाठी ८ ते १० मिनिटांचा वेळ जाईल. त्याचा परिणाम मुंबई-कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ांच्या वाहतुकीवर पडेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mail express stop issue ambernath badlapur railway transport
First published on: 30-06-2017 at 03:10 IST