ठाणे शहरातील पश्चिमेकडे कळवा परिसराचा मोठय़ा प्रमाणात विस्तार झालेला आहे. सर्वात जास्त म्हणजे १९ प्रभाग असलेल्या कळवा परिसरातून दररोज सुमारे २ लाख प्रवासी लोकल, बस, रिक्षा व खासगी वाहनांमधून येथून इच्छित स्थळी ये-जा करीत असतात. कळवा येथून थेट मुंब्रापर्यंत विस्तारलेल्या या भागात मोठमोठी गृहसंकुले उभारण्याचे काम सध्या जोरात  सुरू आहे. मात्र त्या तुलनेत नागरी सुविधांच्या विकासाची गती मात्र मंद आहे. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आता काही गृहसंकुलांनीच पुढाकार घेतला आहे. त्यापैकीच एक म्हणजे पारसिकनगरची ‘मैत्री वाटिका’.
ठाणे शहरालगत असलेला कळवा परिसर हा मनीषानगर, खारेगाव, पारसिकनगर येथील भव्य गृहसंकुलामुळे नावारूपाला आला. कळव्याला लागूनच मुंब्रा परिसर येतो. कळवा-मुंब्रा ही पूर्वी ग्रामपंचायत होती. १९८३ मध्ये ठाणे महापालिकेत या परिसराचा समावेश झाला. ठाणे पश्चिमेकडील घरांचे भाव गगनाला भिडले असताना पश्चिमेकडचाच एक भाग असलेल्या कळव्यात मात्र हे दर आटोक्यात होते. पश्चिमेकडे शिवाई नगर, पोखरण, वसंतविहार, घोडबंदर आदी परिसरांत घरांचे अवाढव्य भाव ऐकून निराश झालेला नोकरदार, व्यावसायिक वर्ग कळव्यात घर घेण्याच्या बाबतीत मात्र समाधानी दिसत होता. त्यामुळे गेल्या सात-आठ वर्षांत येथील लोकवस्तीही झपाटय़ाने वाढली आहे. अर्थात आता मात्र येथील जागांचे भावही गगनाला भिडले आहेत.
कळवा येथील पारसिकनगरमध्ये सात वर्षांपूर्वी ‘मैत्री वाटिका’ हे गृहसंकुल अस्तित्वात आले. चंदन, तुलसी, कस्तुरी अशा सुगंधी नावांनी दरवळलेल्या संकुलात एकूण १० इमारती आहेत. चंदन नावाने चार विंग, तुलसी आणि कस्तुरी नावाने प्रत्येकी तीन विंग अशा सातमजली इमारती दिमाख्याने उभ्या आहेत. इमारतीत २५२ सदनिका आहेत. संकुलाचे सचिव मकरंद वैद्य स्वत: येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवितात. दिवसा पाच आणि रात्री पाच असे १० सुरक्षा रक्षक संकुलातील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. याशिवाय सीसीटीव्ही आहेत. इंटरकॉम सिस्टीम असल्याने कधीही कुणाच्याही घरी सुसंवाद करता येतो व अडचणीच्या वेळी मदत मागता येते.  इमारतीत बँक, एटीएम सेंटर तसेच दुकाने व शेजारीच रिलायन्स बाजार असल्याने आर्थिक व्यवहार आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी फार लांब जावे लागत नाही. मात्र शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये ही मात्र दूरवर आहेत. संकुल परिसरात प्रकृती आणि प्रमिला नावाची रुग्णालये आहेत; परंतु ती फक्त सामान्य स्वरूपाच्या आजारांसाठी उपयुक्त आहेत. गंभीर आजारांसाठी ठाण्यात धाव घ्यावी लागते.  
मैत्री कट्टा
नोकरी आणि व्यवसायातून संकुलाची देखभाल करणे सोसायटीच्या समितीला शक्य होत नाही. त्यामुळे येथील तरुणांनी ‘मैत्री कट्टा’ नावाचा मदतगट स्थापन केला आहे. या मैत्री कट्टाद्वारे संकुलाची देखभाल केली जाते. संकुलात मैत्रीचे वातावरण कायम राहावे यासाठी येथे वर्षभरात अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. आंबेडकर जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी आदी राष्ट्रीय, पारंपरिक सण मोठय़ा उत्साहाने साजरा होत असतात. पाच दिवसांचा गणेशोत्सव येथे साजरा केला जातो. या वेळी लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संकुलातील १५ वर्षांखाली १३२ मुले प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. या मुलांच्या बुद्धीला तसेच त्यांच्या मानसिकतेला चालना देण्यासाठी नवनवीन उपक्रमही येथे राबविले जातात. मुंबईतील ‘नेहरू तारांगण’ पाहण्यासाठी जाणे शक्य होत नसल्याने तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचे तारांगण संकुलात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न मैत्री कट्टय़ातर्फे करण्यात आला. नक्षत्र, आकाशातील ग्रह, तारे यांची ओळख टेलीस्कोपमार्फत या वेळी करून देण्यात आली.
नुकतेच शिवराज्याभिषेकदिनी साहसी खेळांचे आयोजन येथे करण्यात आले होते.  झीप लाइन, रॅपलिंग, लॅडर क्लायम्बिंग आदी खेळांचा यात समावेश होता. उद्यानातील झाडांचा, इमारतींचा तसेच २० फूट शिडीचा त्यासाठी वापर करण्यात आला. ‘टेम्पोलिन’, ‘मून वॉकर’ या खेळ प्रकाराचा एक वेगळा आनंद मुलांना अनुभवता आला. मुलांनी खेळांत दाखविलेले साहस पाहून त्यांच्या आई-वडिलांनाही गहिवरून आले. कृत्रिम पोहण्याचा तलावही आणला होता. त्याचाही मुलांनी मनमुरादपणे आनंद लुटला. उद्योजकाची प्रेरणा निर्माण होण्यासाठी खाद्यपदार्थ, मनोरंजक दुकानेही थाटण्याची मुभा येथे देण्यात आली होती. असे अनेक कार्यक्रम मैत्री कट्टय़ातर्फे राबविले जातात. त्याला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. क्लब हाऊसमध्ये बालसंस्कार शिबीर, योग साधना वर्ग येथे नियमित होत असतात. शरीर बलसंवर्धनासाठी येथे व्यायामशाळाही आहे. त्याचप्रमाणे कॅरम, टेबल टेनिस आदी खेळांची सुविधाही या क्लब हाऊसमध्ये आहे.
पार्किंगची समस्या
पार्किंग ही या संकुलाची मुख्य समस्या आहे. संकुलाला ८० गाडय़ांसाठी स्टील पार्किंग देण्यात आले होते; परंतु आज गाडय़ा दुपटीने वाढल्याने ओपन पार्किंग करावी लागत असून काही गाडय़ांना भर रस्त्यावर उभ्या करावे लागत आहे. येथे सोनसाखळी चोरांचा मोठय़ा प्रमाणात उपद्रव आहे. संकुलाच्या समोरून रात्रीच्या वेळी एकटे जाणे हे धोक्याचे असते. सिनेमागृह, नाटय़गृह असे कोणतेही विरंगुळ्याचे ठिकाण कळव्यात नाही. त्यामुळे त्यासाठी थेट ठाणे गाठावे लागते. मुंब्रा येथे प्रस्तावित खाडी संवर्धन झाल्यास विरंगुळाचे ठिकाण आम्हाला उपलब्ध होऊ शकते, असे मकरंद वैद्य यांनी सांगितले. रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास कळवा स्थानक हे लांब पडते. त्यामानाने मुंब्रा स्थानक जवळ आहे. जर येथे प्रस्तावित कळवा-खारीगाव उड्डाणपूल झाल्यास कळवा स्थानक जवळ पडेल, असे वैद्य यांचे म्हणणे आहे.

हाती घेण्यात येणारे उपक्रम
* पावसाळ्यातील पाण्याचा वापर करण्यासाठी पर्जन्य जल संवर्धन
* अपव्यय होणाऱ्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी पाणी समिती स्थापन करणे
* ओला कचरा- सुका कचरा वर्गीकरण करणे
* कचऱ्यापासून खत तयार करून त्याचा वापर उद्यानातील झाडांसाठी करणे व बायोगॅस तसेच त्यापासून वीजनिर्मिती
* पार्किंग जागा व्यवस्थापन करणे
* मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी मानसोपचार शिबीर घेणे.

समस्या आणि असुविधा
* रस्त्यावरील सोनसाखळी चोरांचा त्रास
* संकुलातील वाढत्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न
* अत्याधुनिक रुग्णालये, करमणुकीची साधने तसेच शाळा, महाविद्यालये, खेळांच्या मैदानांची कमतरता
* दूर अंतरावर असलेले रेल्वे स्थानक