माझी वसुंधरा अभियान ५.० च्या माध्यमातून पालघर तालुक्याच्या नावझे या गावातील नागरीकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबवत ग्रामपंचायत आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.
नैसर्गिक परीसंस्थांचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी आणि वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल या विभागामार्फत एक जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० या अभियानाची राज्याच्या नागरी आणि ग्रामीण भागात अंमलबजावणी सुरु आहे.
पालघर तालुक्यातील नावझे या दोन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये आपला सहभाग नोंदवून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागाने वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचे कार्य सुरु आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारीत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत नावझे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांमध्ये गावातील सर्व ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेत आहेत.
नागरीक आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची भावना निर्माण व्हावी याकरिता तज्ञ मार्गदर्शकांद्वारे जनजागृती उपक्रमासोबतच प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिला जात आहे.
माझी वसुंधरा अभियान ५.० या अभियानांतर्गत वर्षभरात नावझे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे गावात स्वच्छता, घनकचरा आणि ई कचरा व्यवस्थापन, कृषी कचरा व्यवस्थापन, तृणधान्य वापरास प्रोत्साहन, वृक्षारोपण व संवर्धन, औषधी वनस्पतींची लागवड, जास्तीत जास्त सौर उर्जा वापर, एकल वापर प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी वापराचे महत्व, आपत्ती व्यवस्थापन, पावसाचे पाणी साठवणूक प्रणाली, , बांबू, शेवगा आणि वाळा लागवडीस प्रोत्साहन, फटाके बंदी, बायोगस, शोषखड्डे, बीज संकलन, गांडूळ खत प्रकल्प, सण-उत्सवांच्या वेळी होणारे जल व ध्वनी प्रदूषण कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, दवाखाना आणि देवस्थान परिसराचे सुशोभीकरण आणि शांतता क्षेत्र घोषित करणे आदी अनेक उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत नावझे येथे माझी वसुंधरा अभियान ५.० राबविताना भूमी ,वायू,जल, आकाश ,अग्नी या पाच तत्वांवर गावाच्या पर्यावरण रक्षणासाठी काम करण्यात आले.
ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विद्यार्थी, तरुण मंडळ, महिला बचत गट, ग्रामस्थ , कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने प्रत्यक्ष कृती आणि जनजागृती उपक्रम प्रभावीनावर भर दिला. – मानसी मयूर लाटे, ग्रामपंचायत अधिकारी नावझे