ठाणे : माजिवडा येथील एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

माजिवड येथील फतिमा चर्च परिसरात वेलंकनी ही तीन मजली इमारत आहे. ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नं. १०३ विवेक कवीलकर यांच्या घराचा स्लॅब गुरुवारी दुपारी कोसळला. या घटनेत किर्ती कवीलकर (वय अंदाजे ७० ते ७५ वर्षे) यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना मुका मार लागला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर इमारत ‘सी-२-अ’ या धोकादायक प्रवर्गात मोडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ती पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे.

इमारतीत एकूण १२ सदनिका असून त्यामध्ये सुमारे ४० ते ४५ रहिवासी वास्तव्यास होते. यापैकी १२ ते १५ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ४७, माजिवडा येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित बांधकाम धोकादायक स्थितीत असल्याने वेलंकनी इमारत पूर्णपणे सीलबंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही माजिवडा प्रभाग समिती व ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.