ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा-वडपे मार्गाच्या रुंदीकरणाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले असून मे अखेरीस हा संपूर्ण प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग खुला झाल्यास पावसाळ्यात ठाणे, भिवंडी शहरात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळणार असून मुंबईहून समृद्धीच्या दिशेकडील प्रवास देखील काहीसा वेगवान होण्याची चिन्हे आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरुन हजारो वाहनांची दररोज वाहतुक होते.

तसेच भिवंडी आणि नाशिक भागात गोदामे असल्याने उरण जेएनपीटी, गुजरात येथून हजारो अवजड वाहने मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतुक करतात. महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अरुंद आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित असला तरी प्राधिकरणाला या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करता आली नाही. त्यामुळे २०२१ पासून राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गावरील ठाण्यातील माजिवडा ते भिवंडी येथील वडपे या २३.८० किमी प्रकल्प निर्माणाचे, रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते.

परंतु अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. त्यामुळे प्रकल्पास देखील दिरंगाई निर्माण झाली होती. सुमारे पाच वर्ष दुरुस्तीचे काम या महामार्गावर सुरु होते.आता अखरेच्या टप्प्यात काम सुरु असल्याने नागरिकांना कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच येथील साकेत पूलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून येथील नव्या पूलावरून वाहतुक देखील सुरु झाली आहे. लवकरच इतर पुलांची कामे देखील पूर्ण होणार असल्याची माहिती एका अभियंत्याने दिली.

प्रकल्प का महत्त्वाचा ? – या महामार्गाचा वापर कल्याण, भिवंडी, मुंब्रा, नाशिक आणि समृद्धी महामार्गावरील हजारो नागरिक करतात. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे होते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातील माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती – या प्रकल्पातील मुख्य रस्ता २३.८० किमीचा असून सेवा रस्ता १८.३५ किमी इतका आहे. त्यापैकी मुख्य रस्त्याचे काम १९.३० किमी आणि सेवा रस्त्याचे काम १६.३३ किमी पर्यंत पूर्ण झाले आहे. म्हणजेच, मुख्य रस्त्याचे काम ८३ टक्के तर सेवा रस्त्याचे काम ८९ टक्के पूर्ण झाले.

मोठ्या पूलांची कामे – वडपे पूल ९४ टक्के, रेल्वे पूल ७० टक्के, खारेगाव पूल ९७ टक्के आणि साकेत पूलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

भुयारी मार्ग – येवई, वालशिंद, सोनाळे, सरवली, पिंपळास, ओवळी, दिवे या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून पोहोच रस्त्याचे काम मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. तर खारेगाव भुयारी मार्ग एप्रिल पर्यंंत पूर्ण होणार आहे.