ठाण्यात पाऊस थांबला तरी खड्डे कायम ; रात्रीच्या वेळेत खड्डे भरणीची कामे सुरू असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

पाऊस थांबून आठ ते दहा दिवसांचा काळ लोटला तरी शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डेभरणीच्या कामात परतीच्या पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता. परंतु परतीचा पाऊस थांबून आठ ते दहा दिवसांचा काळ लोटला तरी शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची कठोर भूमिका घेऊनही महापालिकेचा अभियंता विभाग ढिम्म असल्यामुळे ठाणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. निलंबित अभियंत्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी महापालिकेत सर्वपक्षीय मोर्चेबांधणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नाहीत का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेत शहरात खड्डेभरणीची कामे सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे महापलिका क्षेत्रातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. खडी आणि मातीच्या साहाय्याने खड्डेभरणीची कामे पालिकेकडून केली जात होती. पाऊस पडताच रस्ते पुन्हा उखडत होते आणि खड्डय़ातील माती रस्त्यावर पसरत होती. पाऊस थांबताच पालिकेने डांबर आणि काँक्रीटच्या साहाय्याने खड्डेभरणीची कामे हाती घेतली. काही दिवसांतच डांबराने बुजविलेले खड्डे उखडले. काँक्रीटने बुजवलेल्या खड्डय़ाच्या भागात रस्ता उंचसखल होऊन त्याशेजारीच आणखी खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी रस्त्यांचा पाहाणी दौरा करून प्रशासनाला खडसावले होते. असे असले तरी शहरातील रस्त्यांवर खड्डे मात्र अद्यापही कायम असून याविषयी सर्वसामान्य ठाणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस थांबताच प्रशासनाने खड्डेभरणीची कामे सुरू केली होती. परतीच्या पावसामुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. परतीच्या पावसामुळे कामाचा दर्जा राखणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने कामे थांबविली होती. परंतु परतीचा पाऊस थांबून आठ ते दहा दिवसांचा काळ लोटला तरी शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे अद्याप कायम आहेत.

खड्डे कुठे?

ठाणे शहरातील बाळकुम जकात नाका सिग्नल परिसर, नौपाडय़ातील मल्हार सिग्नल चौक, नितीन कंपनी चौक, कॅडबरी सिग्नल, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, शहरातील महामार्गालगतचे सेवा रस्ते, घोडबंदर सेवा रस्ते, मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल, वंदना सिनेमागृहाजवळील उड्डाणपूल, साकेत परिसर यांसह शहराच्या विविध भागांत रस्त्यावर खड्डे कायम आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून खड्डेभरणीची कामे प्रभाग समिती स्तरावर सुरू करण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डेभरणीच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेत शहरात खड्डेभरणीची कामे सुरू आहेत.

– अर्जुन अहिरे, नगर अभियंता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Major roads in thane city thane city potholes still remain to be filled zws

ताज्या बातम्या