ठाणे : हजारो तरुणांना सैन्यदलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणारे, शिस्त, देशप्रेम आणि सेवाभावाची प्रेरणा देणारे ज्येष्ठ निवृत्त सैनिक अधिकारी मेजर सुभाष गो. गावंड यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि माजी सैनिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने ठाण्याने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
ठाण्यातील उपवन येथील गावंड बाग परिसरातील राहत्या घरातून दुपारी १२.३० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. मेजर गावंड हे ठाण्यातीलच रहिवासी होते. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील राम नारायण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांना एनसीसीची आवड निर्माण झाली होती. राज्यस्तरीय लाईट मशीन फायरिंग स्पर्धेत त्यांनी ‘बेस्ट शॉट’ करंडक पटकावला होता. याच काळात त्यांच्या मनात सैन्यदलात जाण्याची प्रेरणा निर्माण झाली.
१९६० साली ते डेहराडून येथे भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू झाले. ८ व्या बटालियन महार रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. १९६२ मधील भारत-चीन युद्ध तसेच १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागा आणि मिझो बंडखोरांविरोधातील मोहिमांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. तब्बल २२ वर्षांच्या सैनिकी सेवेत त्यांना २१ वार्षिक मेरिट पदकांसह अनेक सन्मान प्राप्त झाले.
सैन्यातील सेवेनंतरही त्यांनी समाजकार्याची वाट निवडली. १९८८ मध्ये ते रोटरी क्लब ऑफ ठाणेमध्ये सहभागी झाले. विविध पदांवर काम करत १९९५ मध्ये ते क्लबचे अध्यक्ष झाले. मात्र त्यांची खरी ओळख ठरली, ती तरुणांना सैनिकी प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक म्हणून. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना रुजावी, अधिकाधिक युवक-युवतींनी सैन्यदलात दाखल व्हावे या उद्देशाने त्यांनी ‘जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूल’ची स्थापना केली. सुरुवातीला सरस्वती मराठी माध्यम सेकंडरी स्कूलमध्ये आणि नंतर ठाणे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हे प्रशिक्षण वर्ग सुरू होते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी तब्बल पाच हजारांहून अधिक तरुणांना सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन युवती आणि एका युवकाने भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून यश मिळवले. हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी कमाई मानली जात होती. संरक्षण दलातील नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेचे ते १९९७ पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
मेजर गावंड यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. सैनिक वेल्फेअर बोर्ड ऑफ ठाणेचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. पोलीस कौमी एकता समिती, नॉर्थ बॉम्बे मर्चंट असोसिएशन तसेच नागरी संरक्षण व्यवस्थेतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक दुःखद प्रसंग आले. कोविड काळात त्यांच्या मुलाचे निधन झाले होते, तर दोन वर्षांपूर्वी पत्नीचेही निधन झाले. पश्चात त्यांची एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर “उत्साहाचा धबधबा आटला,” अशा शब्दांत भावना व्यक्त होत आहेत.
