कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच

या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी , डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौका जवळील पुलाजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने मंगळवारी रात्री एका मार्गिकेत काँक्रीटीकरणाचे काम केल्याने चौका जवळील एका मार्गिकेमधून वाहनांची येजा सुरू झाली आहे. सर्वाधिक कोंडीच्या पलावा चौकातील रस्ता एक मार्गिकेचा झाल्याने सकाळी या रस्त्यावरुन येजा करणारी वाहने या मार्गिकेत अडकून पडली. डोंबिवलीतून सकाळी आठ वाजता खासगी वाहनाने बाहेर पडलेला प्रवासी सकाळी १० वाजेपर्यंत काटई नाका परिसरात अडकून पडला होता. या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

शिळफाटा रस्ते कामाचा ठेकेदार मनमानेल तसा रस्ता खोदणे, रस्त्यात जेसीबी, पोकलेन आणून कामे सुरू करणे अशी कामे करत आहे. या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा पर्यवेक्षक अभियंता किंवा एमएसआरडीसीचा अभियंता उपस्थित नसल्याने मजूर कामगार कोणाचेही न ऐकता काम करतात. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

मागील चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्या पर्यटकांची वाहने आणि त्याचवेळी बुधवारी कामावर निघालेल्या नोकरदार, विद्यार्थी वाहतुकीची वाहने गुरुवारी सकाळी सात वाजल्या पासून कल्याण-शिळफाटा रस्त्यावर पलावा चौक परिसरात समोरा समोर आली. ही वाहने पुढे जाण्यासाठी मार्ग काढत असताना पलावा चौका जवळील पुलाजवळ ‘एमएसआरडीसी’च्या ठेकेदाराने एका मार्गिकेत काँक्रीटीकरणाचे काम केले आहे. उड्डाण पुलानंतरच्या पोहच रस्त्यावरुन येजा करणारी वाहने एका मार्गिकेतून येजा करु लागल्याने कोंडीत भर पडली. त्यात पलावा, लोढा वसाहतीमधून बाहेर पडणारी वाहने मध्ये घुसल्याने कोंडीत आणखी भर पडली.

चार दिवसानंतर नोकरीवरील कामाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येक दुचाकी, मोटार वाहन चालकाची कामावर जाण्याची घाई होती. त्यामुळे दुचाकी स्वार रस्ताकडेच्या सीमारेषेतून दगड, मातीमधून वाट काढत पुढे जात होते. अनेक मोटार चालक मध्ये वाहने घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. ही सगळी वाहने काटई नाका, काटई उड्डाण पूल, पलावा चौक भागात एकाचवेळी अडकून पडल्याने एकाही वाहनाला हालचाल करण्यास जागा राहिली नाही.

एकमेकांना मागे सारुन पुढे जाणाऱ्या वाहन चालकांनी सर्वाधिक वाहतूक कोंडी केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि त्यांचे पथक सकाळ सात वाजल्यापासून शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा, काटई नाका, पलावा चौक, देसई, पडले भागातील वाहन कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहनांचे नियोजन करण्यासाठी जागाच नसल्याने पोलिसांची दमछाक झाली.

पोहच रस्त्यावरील वाहने

भिवंडी, कल्याण, उल्हासनगर दिशेने या कोंडीत अडकल्याने वाहनांच्या मानपाडा, सोनरापाडा, पिसवली, गोळवली पर्यंत रांगा लागल्या आहेत. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत दिशेने येणाऱ्यांना वाहनांना काटई नाका चौकात येण्यासाठी जागा नसल्याने ही वाहने काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्यावर अडकून पडली आहेत. तसेच, मानपाडा, घारिवली, भोपर, उंबार्ली, काटई, पडले, खिडकाळी, देसई गावांमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना शिळफाटा मुख्य रस्त्यावर येण्यास जागा नसल्याने ही वाहने गावच्या पोहच रस्त्यावर अडकून पडली. त्यामुळे कधी नव्हे अशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी शिळफाट रस्त्यावर झाली आहे.

विद्यार्थ्यांना फटका

डोंबिवली, शिळफाटा रस्त्यालगतच्या रुणवाल, मॅरेथाॅन व इतर नवीन वसाहतीमधील मुले शाळेसाठी लोढा पलावा वसाहतीमध्ये, कोळे, काटई गावांमधील शाळेत सकाळी शालेय बसने जातात. ही मुले सकाळी सात वाजल्यापासून १० वाजेपर्यंत कोंडीत अडकली होती. रुग्णवाहिकांच्या भोंग्यांचा आवाज सतत सुरू होता. रुग्णवाहिकांना रस्ता करुन देण्यासाठी पोलिसांची दमछाक सुरू होती. दुचाकीवरुन मुलांना शाळेत सोडणाऱ्या अनेक पालकांनी शाळा भरुन दोन तास झाल्याने अर्ध्या रस्त्यावरुन घरी परतण्याचा निर्णय घेतला. हे दुचाकी स्वार परतीच्या मार्गात वाहन कोंडीत अडकले.

ठेकेदाराचे ढिसाळ नियोजन

शिळफाटा रस्ते कामाच्या ठेकेदाराचे झालेल्या कामाचे देयक वेळेवर देण्यात आले नाही की तो त्याचा राग रस्त्यावर काम सुरू कोंडी होईल अशा पध्दतीने प्रवाशांवर काढतो, अशी माहिती काटई, निळजे भागातील ग्रामस्थांनी दिली. पलावा चौक भागात काँक्रीटीकरणाचे काम केले तर वाहन कोंडी होईल याची माहिती असुनही त्याने ही कामे सुरू केली. हे काम केले तर त्याला पर्याय मार्ग उपलब्ध करुन मग ठेकेदाराने काम करणे आवश्यक होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. या कामावर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. ठेकेदार मनमानी करतो. त्याचा फटका कोंडीतून प्रवाशांना बसत आहे.

लोढा पलावा चौक येथील रस्त्यात काँक्रीटीकरणाचे काम रात्रीतून करण्यात आले. त्यामुळे एक मार्गिकेतून वाहने धावत आहेत. त्यात पुढे जाण्याच्या वाहनांच्या शर्यतीमुळे कोंडीत आणखी भर पडून शिळफाटा रस्ता कोंडीत अडकला आहे. – रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग

सकाळी आठ वाजता डोंबिवलीतून निघाले. १० वाजले तरी आमचे वाहने काटई चौकाच्या पुढे गेलेले नाही. रस्ते काम करताना प्रवाशांचा विचार केला जात आहे की नाही. या रस्त्याचा ठेकेदार, त्यावरील नियंत्रक अधिकारी यांचा समन्वय आहे की नाही. की फक्त प्रवाशांना कोंडीत अडकविण्यासाठी शिळफाटा रस्त्याची बांधणी सुरू आहे. – स्वाती पांडे, उच्चपदस्थ नोकरदार

नातीला सोडविण्यासाठी मुलगा लोढा पलावा चौक येथे सकाळी सात वाजता दुचाकी वरुन गेला. १० वाजले तरी तो शाळेत पोहचला नव्हता. अर्ध्या वाटेतून मुलगा मुलीला घेऊन परत आला. परतीच्या मार्गात तो अडकून पडला आहे. – नरेश पाटील, काटई

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उल्हासनगर : ६२ गुन्ह्यांची उकल, ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तांतरीत ; नगर परिमंडळ चारच्या पोलिसांची चमकदार कामगिरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी