scorecardresearch

रेल्वे कामगारांच्या दक्षतेमुळे कल्याणजवळ अपघात टळला ; कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रुळाला तडा 

रूळ तुटल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक अधिकारी, त्यांचे दुरुस्ती, देखभाल पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले.

रेल्वे कामगारांच्या दक्षतेमुळे कल्याणजवळ अपघात टळला ; कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रुळाला तडा 
कल्याण रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेला़ देखरेख करणाऱ्या दोन कामगारांमुळे मोठा अनर्थ टळला.

कल्याण : कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याचे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता देखरेख करणाऱ्या दोन कामगारांना समजल्यानंतर त्यांच्या दक्षतेमुळे येथे मोठा अपघात टळला. या कामगारांपैकी एकाने तातडीने ठाकुर्लीकडून पत्रीपुलाच्या दिशेने येणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसला पुढे धावत जाऊन लाल झेंडा दाखविला. लोको पायलटने पुढे काही अनर्थ आहे असे समजून एक्स्प्रेसचा वेग कमी करून एक्स्प्रेस थांबवली. त्यामुळे रूळ देखरेख कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.  

मंगळवारी सकाळपासून मिथुन कुमार आणि हिरालाल हे रेल्वे रूळ देखरेख कामगार पत्रीपूल परिसरात रूळ, सांधाजोड देखरेखीचे काम करत होते. मिथुन कुमार याला पत्रीपुलाजवळ रुळाला तडा गेला आहे असे दिसले. या तुटलेल्या रुळावरून लोकल, एक्स्प्रेस गेली तर अनर्थ घडेल असे लक्षात आल्याने मिथुन कुमारने तातडीने ठाकुर्ली दिशेकडून येत असलेल्या इंद्रायणी एक्स्प्रेसच्या दिशेने धावत जाऊन लाल झेंडा दाखवला. एक्स्प्रेसचा वेग मंदावला. हिरालालने रुळाला तडा गेल्याची माहिती तातडीने रेल्वे नियंत्रण कक्ष आणि तांत्रिक विभागाला दिली. 

रूळ तुटल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक अधिकारी, त्यांचे दुरुस्ती, देखभाल पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पुणे, नाशिककडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, कसारा, खोपोली, कर्जतकडे जाणाऱ्या सर्व लोकल जागीच थांबविण्यात आल्या.

वेळापत्रक बिघडले

ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना घडल्या घटनेची माहिती दिली जात होती. आता लोकल कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. सकाळी साडेसहा वाजल्यापासून कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल, एक्स्प्रेस सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे कल्याणकडे येणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ा ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, मुंब्रा, दिवा भागात खोळंबल्या. कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाणे, मुंब्रा स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली. दुरुस्तीचे काम सकाळी सव्वासात वाजता संपल्यानंतर तातडीने कर्जत, कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत रेल्वेचे लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यानंतर लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Major train mishap averted in kalyan due to 2 trackmen found crack on track zws