आजकालची युवा पिढी ही आपल्यातील नवनवीन कल्पनांमुळे त्यांना अपेक्षित पण इतरांना अनपेक्षित अशा यशाला गवसणी घालत आहे. जोशी बेडेकर महाविद्यालयातील बी.एम.एम.च्या विद्यार्थ्यांनी ‘मृदगंध’ फिल्मच्या माध्यमातून अशीच किमया साध्य केली आहे. ‘बाजीराव’ या लघुपटाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशानंतर त्यांनी ‘तमिस्त्रा’ ही नवी आशयपूर्ण कलाकृती साकारली आहे. त्याच्या याच प्रवासाविषयीचा घेतलेला हा वेध…

‘रात्रीचा समुद्र पाहू नये नुसता ऐकावा’ या विचारातून निर्माण झालेला लघुपट म्हणजेच ‘तमिस्त्रा’. ‘तमिस्त्रा’ म्हणजेच रात्र. लघुपटातील नायिकेला एखाद्या व्यक्तिपेक्षा रात्र म्हणजेच ‘तमिस्त्रा’ अधिक जवळची भासत असते. ‘तमिस्त्रा’च्या स्वागतासाठी ती कधी पायात घुंगरू घालून नृत्य करत राहते, तर कधी रात्र होताच ध्यानस्थ बसते. कधी बदामांच्या पानांवरल्या रेषा आणि आपल्या हातांवरल्या रेषा यांचा मेळ घालू बघते तर कधी नंतर त्याच पानांचा ढीग करून ती जाळून टाकत असते, असं हे नेहमीच होत असतं. तिच्या मते या प्रकारे ती ‘तमिस्त्रे’शी संवाद साधत असते. रात्र होताच ती नेहमी नायकासोबत समुद्राच्या किनारी जाऊन बसते. समोरचा समुद्र अंधाराच्या स्वाधीन झालेला असताना त्याला बघण्यापेक्षा तो नीट ऐकूया असं तिचं त्याला सांगणं असतं. पुढे तिची ‘तमिस्त्रे’बद्दलची ओढ वाढत जाते आणि त्याचा परिणाम नायकाच्या आणि तिच्या नात्यावर होऊ  लागतो. तिला हवीशी वाटणारी रात्र त्याला अस्वस्थ करते आणि तो आयुष्याच्या वाटेवर तिची साथ सोडण्याचा निर्णय घेतो. रात्री समुद्रावर बसल्यानंतर तो तिला शांतपणे त्याचा निर्णय सांगतो, पण एकही शब्द न बोलता ती समुद्राला स्वाधीन होऊन जाते. ती गेल्यानंतर नायकाला कसं वाटतं? त्याचं पुढे काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘मृदगंध फिल्म्स्’चा ‘तमिस्त्रा’ हा लघुपट पाहिल्यावर आपल्याला मिळतात. जोशी-बेडेकर महाविद्यालयातील बी.एम.एम. विभागातील काही विद्यार्थ्यांनी मिळून ‘मृदगंध फिल्म्स’ची सुरुवात केली. ‘मृदगंध फिल्म्स’च्या ‘बाजीराव’ या पहिल्याच लघुपटाला राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवात गौरविण्यात आले.

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचा सामाजिक विषय ‘बाजीराव’मधून हाताळल्यानंतर या ग्रुपने एका वेगळ्या धाटणीच्या स्क्रिप्टच्या शोधात असताना ऋग्वेद देशपांडेने त्यांनीच लिहिलेली ‘तमिस्त्रा’ची संकल्पना सांगितली. अत्यंत अ‍ॅबस्ट्रेक्ट धाटणीची संकल्पना असल्यामुळे सगळ्यांना ऐकताचक्षणी ती आवडली. ‘तमिस्त्रा आणि ती’ ही एकांकिका ऋग्वेद देशपांडेने २००३ साली लिहिली आणि या निमित्ताने एकांकिकेचे रूपांतर लघुपटात करण्यात आले. ‘बाजीराव’ लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याला विशेष पुरस्कारही मिळाला होता. त्या अनुराग जाधव याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. केवळ दोन पात्रांच्या या लघुपटात तेजस्विनी बर्वे व आशीष जगताप यांनी अभिनय केला आहे. या लघुपटाच्या चलचित्राचे जबाबदारी आदित्य जामगावकर, भावेश कोळी, पुष्कर गोरीवले आणि केदार कारेकर यांनी सांभाळली. तर संकलनाची धुरा शोनील यल्लातीकर याच्या खांद्यावर होती. लघुपटाचे प्रॉडक्शन आणि तांत्रिक सहकार्याची बाजू समर्थ शास्त्री, गोरख हिवाळे, वर्षां गोडांबे, दर्शन पोस्ती, प्रगती सूर्यवंशी, सागर व किरण होळकर यांनी घेतली. लघुपटाच्या संगीताची बाजू ही ऋग्वेदने पार पाडली. लघुपटाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या नृत्याचे दिग्दर्शन हे प्रिया टिपाले हिने केले. कथेचा आवाका मोठा असल्याने अतिशय भक्कम आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. त्याच वेळी निर्माते म्हणून तपीश जोशी, महेश पाटील व राजीव शेलार खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. ‘तमिस्त्रा’चा विषय अगदीच वेगळा असल्याने तो मांडणं खूप कठीण होत. कथेची गरज म्हणून फारशी वर्दळ नसलेला समुद्रकिनारा हवा होता म्हणून अर्नाळा समुद्रकिनारा त्यासाठी योग्य आहे, असं ठरलं. त्यात समुद्रकिनारी रात्री चित्रीकरण करणे जास्त आव्हानात्मक होते. लघुपटाचा बराचसा भाग हा रात्रीचा असल्या कारणाने चित्रीकरण हे रात्री तीनपर्यंत चालत असे. जास्त वारा व समुद्रकिनारी कोणताही लाइट नसल्याकारणे चित्रीकरणास अडथळा येत होता, पण त्यावर उपाय म्हणून सर्व टिमने आपल्या दुचाकीच्या हेडलाइट्स लावल्या व समुद्रकिनारीचे चित्रीकरण पूर्ण केले. तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर हा लघुपट विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होण्यास सज्ज झालेला आहे. ‘मृदगंध फिल्मस’ या नावाने असलेल्या फेसबुक व यूटय़ूब पेजवर आपल्याला त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल माहिती मिळू शकते व भविष्यात अजून उत्तमोत्तम काम करण्याचा मानस ‘मृदगंध फिल्मस’च्या संपूर्ण टिमने व्यक्त केला आहे.