बदलापूरः निसर्गाचा अनमोल ठेवा आणि गर्द झाडीत राहणारा दुर्मिळ ”मलबार ट्रोगोन” ज्याला स्थानिक भाषेत ”मलबारी कर्णा” असेही म्हणतात, हा पक्षी सध्या बारवी धरणाच्या आसपासच्या जंगलात काही हौशी पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांच्या चुकीच्या उपद्व्यापांमुळे संकटात सापडला आहे. केवळ जवळून फोटो काढण्यासाठी किंवा पक्षी पाहण्यासाठी मोबाईलवर कृत्रिम आवाज (Bird Calling) लावण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे या अत्यंत लाजाळू पक्ष्याची दिनचर्या पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवर असलेल्या बारवी धरण परिसर निसर्गसंपन्न परिसर आहे. पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमींना हा परिसर खुणावतो. मात्र काही अतिउत्साही पक्षीप्रेमींमुळे येथील दुर्मिळ पक्षांना नाहक त्रास होत असल्याची बाब काही संवेदनशील पक्षीप्रेमींनी उघडकीस आणली आहे.

आजकाल जंगलात पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्यांकडे मोबाईलमध्ये विविध पक्ष्यांच्या आवाजाच्या रेकॉर्डिंग्स किंवा अॅप्स असतात. जंगलात विशिष्ट पक्ष्याचा शोध घेण्यासाठी मोबाईलवर मोठ्या आवाजात त्या पक्ष्याचा कृत्रिम आवाज लावला जातो. यालाच ”बर्ड कॉलिंग” म्हणतात. जेव्हा ”मलबार ट्रोगोन”चा असा आवाज लावला जातो, तेव्हा जंगलात असणाऱ्या नर ट्रोगोनला वाटते की आपल्या भागात दुसरा कोणीतरी नर पक्षी आला आहे किंवा कोणीतरी त्याला साद घालत आहे. या मोहापायी किंवा स्वतःचे क्षेत्र राखण्याच्या भावनेतून तो विचलित होतो, उडतो आणि आवाजाच्या दिशेने जवळ येण्याचा प्रयत्न करतो, असे पक्षी अभ्यासक शाहिद शेख यांनी सांगितले आहे.

मुरबाडच्या जंगलात गेल्या १५ ते २० दिवसांपासून अशा प्रकारे सातत्याने कृत्रिम आवाज देण्याचे प्रकार सुरू आहेत. सध्या मलबार ट्रोगोनचा प्रजनन काळ सुरू आहे. अशा संवेदनशील काळात कृत्रिम आवाजाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत.मोबाईलच्या आवाजामुळे विचलित होऊन जर त्याने जागा सोडली, तर त्याची जोडी सुटू शकते आणि अंडी किंवा पिल्ले उघडी पडू शकतात. प्रजनन काळात हे पक्षी प्रक्रियेत अत्यंत मग्न आणि गाफील असतात. अशा वेळी शिकारी पक्षी त्यांच्यावर सहज हल्ला करू शकतात, असेही शेख यांनी सांगितले. कृत्रिम आवाजामुळे पक्षी एकाच जागी वारंवार येत असल्याने, त्याची ओळख सर्वांना होते. परिणामी, तिथे मानवी वर्दळ वाढते. त्यामुळे हे पक्षी ती जागा कायमची सोडून जाऊ शकतात, ज्यामुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होईल. या त्रासामुळे पक्ष्यांचे घरटे बांधणे आणि पिल्लांना भरवणे या दोन्ही महत्त्वाच्या प्रक्रियांवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे.

मुरबाडमध्ये कधी आढळला

मूळचा दक्षिण भारतातील जंगले, सिंधुदुर्ग, गोव्याचा काही भाग आणि कर्नाटकातील दांडेली अभयारण्यात आढळणारा हा पक्षी २०१२ मध्ये पहिल्यांदा मुरबाडच्या वनक्षेत्रात आढळून आला होता. दक्षिण भारतात जाण्यापेक्षा मुंबईनजीकच्या मुरबाडमध्येच हा पक्षी पाहायला मिळतो, या भावनेतून ठाणे, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील पक्षीप्रेमी व छायाचित्रकार सध्या मुरबाडच्या जंगलात गर्दी करत आहेत.

प्रतिक्रियाः केवळ चांगल्या फोटोसाठी किंवा पक्षी जवळून पाहण्याच्या हट्टापायी निसर्गाच्या नियमांविरुद्ध जाऊन ”बर्ड कॉलिंग” करणे अत्यंत चुकीचे आणि क्रूर आहे. निसर्गाची ही संपन्नता टिकवायची असेल, तर पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप थांबवणे गरजेचे आहे. – अविनाश हरड, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे.

प्रतिक्रियाः याबाबत काही पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनी माहिती दिल्यानंतर पक्षी निरिक्षकांच्या वेळेत आम्ही गस्त सुरू केली आहे. वन विभागाचे कर्मचारी येथे गस्त घालत आहेत. हे प्रकार रोखले जातील. – संजय धारवणे, वन क्षेत्रपाल, बदलापूर.