अंबरनाथः मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निकाल लवकरच लागेल. तो निकाल मलंगभक्तांच्या अपेक्षेनुसार असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान त्यांनी श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीस्थळी दर्शन घेत पूजा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत असून दोन धर्मियांकडून येथे दावा केला जातो आहे.

माघी पौर्णिमेच्या निमित्ताने मलंगगड परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघाला असून राज्यासह परराज्यातूनही हजारो भाविक नाथांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी येथे भक्तीभावाने पालखीचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीची विधीवत पुजा करून तीची मिरवणूक काढली जाते. याचा मान विशिष्ट कुटुंबाकडे गेल्या अनके वर्षांपासून आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी येथे यात्रेला सुरूवात होते. तर पुढील काही दिवस येथे जत्रा असते.

सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर भेट दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून पुढील काळातही याच भक्तिभावाने ती सुरू राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यंदाच्या यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहत होते. मात्र या सुविधेमुळे त्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

आनंद दिघेंनी सुरू केलेल्या सेवाभावी उपक्रमांची परंपरा आजही कार्यकर्ते व संस्था जपत असून यात्रेचा अनुभव अधिक सुरक्षित व सुखकर करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असून लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फ्युनिकुलरचा भाविकांना लाभ

गेल्या महिन्यात मलंगगडावर जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेली फ्युनिकुलर ट्रेन सेवा सुरू झाली. त्यामुळे तीन तासांचा प्रवास अवघ्या दहा मिनीटात होतो आहे. त्यामुळे भाविकांनी मलंगगडावर भेट देण्याचे प्रमाण वाढवले आहे. यात्रेनिमित्त ज्येष्ठ नागरिक, लहान भाविकांना याचा मोठा फायदा होतो आहे.