कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आणि भाजपने अगोदरच पालिकेतील विषय समित्यांची पदे वादंग न माजवता सामोपचाराने वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभापती पदी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे मल्लेश शेट्टी, शिक्षण समिती सभापती पदी भाजपचे अभिजीत थरवळ यांची बिनविरोध निवड झाली. शेट्टी हे स्थायी समिती सभापती पदी मागील २५ वर्षात तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत.

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी पालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, पालिका सचिव बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती पदी महायुतीच्या सारिका जाधव यांची निवड झाली. स्थायी समिती सभापती, शिक्षण मंडळ, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारी करण्यात आली. महायुतीतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेनेतर्फे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनांप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे, उपमहापौर राहुल दामले, भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी स्थानिक पातळीवर विषय समित्यांचे उमेदवारीचे निर्णय घेतले.

गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी विरोधी पक्षाकडून एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही. महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. स्थायी समिती सभापती पदी मल्लेश शेट्टी, शिक्षण मंडळ समिती सभापती पदी अभिजीत थरवळ आणि महिला बालकल्याण समिती सभापती पदी सारिका जाधव यांची बिनविरोध निवड होत असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी जाहीर केले. आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तिसऱ्यांदा सभापतीपद

मल्लेश शेट्टी तिसऱ्यांदा स्थायी समिती सभापती विराजमान झाले आहेत. यापूर्वी ते ऑक्टोबर २००१ ते ऑक्टोबर २००२, एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत स्थायी समिती सभापती पदी होते. शेट्टी यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला महायुतीमधील नेत्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याचे समजते. या स्थायी समितीच्या कालावधीत नेहमीप्रमाणे फक्त ठेकेदारांचे भले होते की शहराचे भले होते याकडे नागरिकांचे विशेष लक्ष असणार आहे. स्थायी समिती पालिकेची तिजोरी म्हणून ओळखली जाते. या समितीत सभापती, सदस्य म्हणून शिरकाव केलेले नगरसेवक नंतर वरचढ झाल्याची चर्चा आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या सूचनांप्रमाणे शहर विकास समोर ठेऊन आपण स्थायी समितीत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करू. पालिकेची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पूर्ण होणारी विकास कामे हाती घेऊ. पालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील लेखा परीक्षण करून घेण्यासाठी आपण आग्रही राहू. आपण यापूर्वी या पदावर काम केले आहे त्यामुळे आव्हानात्मक असे आपणास वाटत नाही. – मल्लेश शेट्टी, सभापती.