बदलापूर: निसर्गरम्य माळशेज घाट परिसरात प्रस्तावित असलेल्या अदानी समूहाच्या १५०० मेगावॅट क्षमतेच्या माळशेज घाट भोरांडे उदंचन प्रकल्पाला दोन्ही जिल्ह्यांमधून मोठा विरोध होत आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील जनसुनावण्या प्रशासनाला स्थगित करायला लावल्यानंतर, आता हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी मुरबाड आणि जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत संयुक्त लढा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या लढ्याची पुढील दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी नुकतीच मुरबाड तालुक्यातील भोरांडे येथे कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

भोरांडे येथे झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या विविध पैलूंवर आणि आतापर्यंतच्या संघर्षावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्नर तालुक्यात हा प्रकल्प मंजूर झाल्यापासून तेथील स्थानिकांनी जनसुनावणी रद्द होईपर्यंत जो प्रखर लढा दिला, त्यातील सर्व महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा या बैठकीत सादर करण्यात आला. यामध्ये लोकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती, नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेली विविध आंदोलने आणि प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची माहिती देण्यात आली. तसेच, प्रकल्पाविरोधात शासनाला दिलेली निवेदने, राजकीय पक्षांची भूमिका आणि सामान्य नागरिकांच्या भावना यावर कार्यकर्त्यांनी सविस्तर मते मांडून नव्या बाबी समोर आणल्या.

एकत्रित लढ्याची आगामी रणनीती

”सह्याद्री वाचवा संघर्ष समिती”च्या माध्यमातून माळशेज–भोरांडे प्रकल्पाच्या विरोधातील हा लढा आता अधिक व्यापक आणि संघटित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. केवळ सुनावणी रद्द करून न थांबता, कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर प्रकल्प हद्दपार करण्यासाठी रणनीती निश्चित करण्यात आली आहे. आगामी काळात मुरबाड आणि जुन्नर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्र बसून संयुक्त आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणार आहेत. दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयासाठी नियमितपणे माहितीची देवाणघेवाण केली जाईल. पेसा कायद्याचे उल्लंघन, बोगस सर्वेक्षण आणि पर्यावरणीय अहवालातील त्रुटी यांसारख्या प्रकल्पासंदर्भातील कायदेशीर अडचणी व बाबी सविस्तर समजून घेऊन त्याआधारे कायदेशीर लढा उभा केला जाईल.

सह्याद्री वाचवा संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीला समितीच्या वतीने किरण लोहकरे आणि डॉ. अमोल वाघमारे, मुरबाड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये गणपत मेंगाळ, मोहन भला, अविनाश हरड, ॲड. दिव्या ठाकूर, माजी उपसभापती अरुणा खाकर, सरपंच कविता वरे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ खाकर, केशव चौधरी, वामन खाकर, नथु पारधी, पांडू बांगर, मालोजी मेंगाळ, आणि गणपत शेळकंदे यांचा समावेश होता.