सहजसफर : निर्झर सौंदर्याची मुक्त उधळण

हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या नि उंचच उंच गिरीशिखरांनाही धुक्याच्या दुलईत लपेटणारे नभ, खळाळत वाहणारे हिमधवल धबधबे आणि त्यातून उडणारे जलतुषार..

tvlog03हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या नि उंचच उंच गिरीशिखरांनाही धुक्याच्या दुलईत लपेटणारे नभ, खळाळत वाहणारे हिमधवल धबधबे आणि त्यातून उडणारे जलतुषार.. हे लोभसवाणे सौंदर्य डोळय़ांत साठवायचे असेल आणि निर्झर सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, तर माळशेज घाटात जरूर यावे. मुंबई-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर मुरबाडजवळ असलेला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याचा हा प्रदेश दरवर्षी पावसाळय़ात पर्यटकांना खुणावतो. पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची या घाटात मोठी गर्दी उसळते.
माळशेज घाटातील निसर्गसौंदर्याचा नजारा अनुभवण्यासारखा आहे. सणावाराला हिरवा चुडा नि हिरवा शालू ल्यायलेल्या सुवासिनीप्रमाणे माळशेज घाट पावसाळय़ात वाटतो. डोंगरदऱ्यांतून असंख्य धबधबे निघू लागतात आणि या दुधाळ पाण्यात जलक्रीडा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी व आनंद ओसंडून वाहतो. एखाद्या पावसाळी पर्यटनस्थळी एखाद्दुसरा धबधब्यावर भिजण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. मात्र महामार्गावरच असलेल्या माळशेज घाटात धबधब्यांची मालिकाच पाहायला मिळते. नागमोडी वळणे आणि डोंगराच्या कपारीतून निघालेले फेसाळ धबधबे हे या घाटाचे आकर्षणच आहे.
घाटातील प्रत्येक धबधब्याला असे वैशिष्टय़पूर्ण नाव नाही. पण पर्यटकांनीच आणि प्रशासनानी काही धबधब्यांचे नामकरण केलेले आहे. त्यातच थितबी-सावर्णे, अंबामाळी, निसर्ग किमया, नानणतळा हे धबधबे पाहण्यासारखे आहेत. घाटात जात असताना दूर डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांत कोसळणारा हा धबधबा आणि तेथील निसर्गसौंदर्याचा नजराणा पाहताना तोंडातून आपसूक ‘वाह’ असे शब्द बाहेर येतात.
माळशेट घाटात जुन्नरकडे जाणाऱ्या मार्गावर लागणाऱ्या बोगद्याजवळून दऱ्याखोऱ्यांतून निसर्गसौंदर्य खूपच मनमोहक वाटते. डोंगरावरून पडणारे जलतुषार अंगावर घेताना मनमुराद आनंद मिळतो, पण या मार्गावरून गाडी जाताना गाडीवर पडणारा पाण्याचा धो धो आवाज मनाचा थरकापही उडवितो. पण या नागमोडी वळणावरून प्रवासाचा आनंद काही अवर्णनीयच आहे. बोगद्यातून पुढे गेल्यावर एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. तेथून घाटाचे, डोंगरदऱ्यांचे आणि घनदाट जंगलाचा रमणीय नजराणा दिसतो. हा नजराणा डोळय़ांत साठवताना पर्यटकांची पावले या परिसरातून निघण्यासही मागत नाहीत.

माळशेज घाट
* मुंबई-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग २२२वर हा घाट लागतो. कल्याणहून अहमदनगर, जुन्नर परिसरात जाण्यासाठी एसटी बसची सोय आहे. मुरबाडहून काही अंतरावरच हा घाट लागतो.
* बदलापूर-अंबरनाथ आणि शहापूर येथूनही मुरबाडकडे जाण्यासाठी रस्ते आहेत.

ही काळजी घ्या..
* निसर्गसौंदर्याने बहरलेल्या या रमणीय पर्यटनस्थळाचे सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे येथे धिंगाणा करणे आणि निसर्गास बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नका.
* धबधब्याच्या ठिकाणी मद्यप्राशन करणे गैर आहे.
* येथे खोल दऱ्या आहेत. त्यामुळे फिरताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच दरडी कोसळण्याची भीती असल्याने पर्यटनाचा जपून आनंद घ्या.
* महामार्गावरच हे पर्यटन केंद्र येत असल्याने पर्यटनाचा आनंद घेताना रस्त्यावर अधिकाधिक भटकू नका. अपघात होण्याची शक्यता आहे.
* माकड किंवा अन्य जंगली श्वापदांपासून सावधान.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Malshej ghat during the monsoons