बदलापूरः पावसाळ्याच्या दिवसांत माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शनिवारी पुन्हा एकदा घाटात एक मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. डोंगराचा काही भाग आणि मोठे दगड अचानक रस्त्यावर आल्याने एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे घाटातील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती.

कल्याण अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाट राज्यांतर्गत वाहुकीसाठी महत्वाचा मानला जातो. पावसाळी पर्यटनासाठीही माळेशज घाट ओळखला जातो. मोठ्या संख्येने पर्यटन येथे येत असतात. शेती उत्पादने, भाजीपाला, दूध वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. त्यामुळे येथे काही कारणाने वाहतूक ठप्प झाल्यास त्याचा मोठा परिणाम होतो.

शनिवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास येथे कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवर काही दगड आणि माती आली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि तहसिल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर आलेले मातीचे ढिगारे आणि दगड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. अवघ्या २० ते २५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर रस्त्यावरील दरड हटवण्यात प्रशासनाला यश आले. अडीचच्या सुमारास दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

माळशेज घाटात यापूर्वीही अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली होती. अवघ्या काही दिवसांच्या पावसाने ती दरड कोसळली होती. शनिवारची दरड कोसळण्याची घटना मोठी असली तरी, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. दरड कोसळली त्यावेळी त्या ठिकाणाहून कोणतीही गाडी जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. तरी प्रशासनाकडून घाटातून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, खराब हवामानात वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.