बदलापूरः पावसाळ्याला सुरुवात होताच माळशेज घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी पुन्हा एकदा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र, प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या तासाभराच्या आत रस्त्यावरील दरड बाजूला हटवण्यात यश आले. घाटातील वाहतूक दुपारी साडे अकराच्या सुमारास सुरळीत आणि पूर्वपदावर आली होती.

माळशेज घाटातून अहिल्यानगरच्या दिशेने जाताना बोगदा ओलांडण्यापूर्वी, मुरबाडच्या बाजूला सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी डोंगरावरून मोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आला होता. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे सुरुवातीला प्रवाशांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर काम करत अवघ्या एका तासाच्या आत रस्त्यावरील माती आणि दगडांचे ढिगारे पूर्णपणे बाजूला करण्यात आले.

सध्या घाटातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. मात्र, माळशेज घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर दाट धुके पसरले असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहने अत्यंत संथ गतीने मार्गक्रमण करत आहेत. वाहतूक संथ असली तरी रस्ता खुला झाल्याने परिस्थिती आता पूर्णपणे पूर्वपदावर आणि नियंत्रणात असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.

जुन्या घटनांची पुनरावृत्ती

माळशेज घाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही घाटातील किलोमीटर काही ठिकाणी अशीच एक मोठी दरड अचानक रस्त्यावर कोसळल्याने एका बाजूची वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. सुदैवाने त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. प्रशासनाने २० ते ३० मिनिटांत रस्ता मोकळा केला होता. आजच्या घटनेतही प्रशासनाने वेळेत रस्ता मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, दाट धुके आणि सततचा पाऊस पाहता घाटातून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वाहने जपून आणि वेगमर्यादेत चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.