बदलापूर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील मौजे करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्याने रविवारपासून माळशेज घाटामार्गे होणारी वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. अहिल्यानगर, पुणे भागात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प असून प्रवाशांना कर्जत, खोपोली-लोणावळा- तळेगाव-चाकण-खेड मार्गे आळेफाटा वा शहापूर-कसारा-सिन्नर मार्गे आळेफाटा असा प्रवास करावा लागत आहे.
योग्य माहिती दिली जात नसल्याने खचलेल्या रस्त्यापर्यंत वाहने जात असल्यानेही प्रवाशांचा मोठा वेळ खर्ची पडत आहे. त्याचा परिणाम दूध, भाजीपाला विक्रेत्यांसह वाहनचालकांनाही सहन करावा लागत आहे.
माळशेज घाट हा अहिल्यानगर, पुणे, मुंबई आणि ठाणे या शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होते. शिवाय, राज्य परिवहन मंडळाच्या बस आणि खासगी वाहनांद्वारे होणाऱ्या प्रवासी वाहतुकही मोठी आहे. मात्र हा मार्ग बंद झाल्याने सर्व वाहतूक व्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे.
खचलेला हा रस्ता अवघ्या एका वर्षापूर्वीच नव्याने करण्यात आला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. घाटात एका बाजूला मोठा डोंगर असून, मुसळधार पावसात तेथून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली येते. रस्त्यावरून पाणी वाहून जाऊन नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने येथे गॅबियन पद्धतीचा बंधाराही बांधला होता. मात्र, पाण्याचा वेग व दाबामुळे हा बंधाराही काही फूट खाली सरकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एका वर्षातच रस्त्याची अशी दुर्दशा झाल्याने बांधकामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्ता खचल्यानंतर सुरुवातीला प्रशासनाकडून वाहतूक वळवण्याचे कोणतेही योग्य नियोजन करण्यात आले नव्हते. घाटाच्या सुरुवातीलाच वाहने रोखून त्यांना पर्यायी मार्ग सांगण्याची व्यवस्था नसल्याने अनेक प्रवासी वाहने थेट खचलेल्या रस्त्यापर्यंत पोहोचत होती. या भोंगळ कारभारामुळे आणि पूर्वसूचनेअभावी झालेल्या गैरसोयीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत पत्र जाहीर केले असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत अधिकृत वाहतूक अधिसूचना जाहीर केली आहे.
पाच तासांचा वळसा
सध्या माळशेज घाट बंद असल्याने कल्याणहून या मार्गे जायचे असल्यास एकतर म्हसा, कर्जतमार्गे खोपोली, लोणावळा, तळेगाव – चाकण, नारायणगाव – आळेफाटा असा किंव शहापूर – कसारा – इगतपुरी – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा असा प्रवास करावा लागतो आहे. हा प्रवास दोन तासांऐवजी साडे चार ते पाच तासांचा झाला आहे.
