कल्याण- अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका इसमाकडून बाॅम्ब ठेवण्यात आला आहे. अशी माहिती रेल्वे सेवा संपर्क कक्षाला देऊन रेल्वे पोलिसांची तारांबळ एका अज्ञात इसमाने रविवारी रात्री उडविली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सेवासंपर्क कक्षात आलेल्या संपर्क क्रमांकावरून तांत्रिक माहितीच्या आधारे दोन जणांना अटक केली. अतुल

प्रजापती (२७), प्रदीप प्रजापती (२८) अशी आरोपींची नावे आहेत. दोघे कळवा येथील राहणारे आहेत.

अंबरनाथ रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यांना ही माहिती दिली. तात्काळ बॉम्ब शोध पथक घटनास्थळी रवाना झाले. ठाणे ते बदलापूर दरम्यानचे १५० पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकात दाखल झाले. रेल्वे स्थानकातील प्रत्येक कोपरा या पथकाच्या साहाय्याने पहाटे पर्यंत तपासण्यात आला. तपासणीत काही आढळून आले नाही. प्रवाशांना घाबरविणे आणि पोलिसांना हेतुपुरस्सर त्रास देण्यासाठी ही माहिती देण्यात आली असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. सेवासंपर्क क्रमांकावर आलेल्या संपर्क क्रमांकाची माहिती घेऊन पोलिसांनी तात्काळ तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी ठाण्याजवळील कळवा भागात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. कळवा येथून अतुल प्रजापती या इसमाने रेल्वे संपर्क क्रमांकावर संपर्क साधला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून प्रदीप प्रजापतीला अटक करण्यात आली. अतुलच्या मोबाईलवरुन प्रदीपने खोटी माहिती रेल्वे संपर्क क्रमांकावर दिली होती. हे तपासात उघड झाले.