ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळच असलेल्या बी केबिन परिसरातील इमारतीमध्ये घुसून पाचव्या मजल्यावरील घर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरटय़ाला पोलिसांनी रहिवाशांच्या मदतीने अटक केले. महम्मद अहमद कलोमिया खान असे या आरोपीचे नाव असून नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केले आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
ठाण्यातील बी केबिन परिसरात जयश्री सिद्धिविनायक ही सात मजली इमारत असून त्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सारंग कुटुंबीय राहतात. घरगुती कामानिमित्ताने ते गावी गेलेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेऊन आरोपी आणि त्याचे अन्य तीन साथीदार त्यांच्या घराजवळ पोहोचले.
दाराची कडी तोडण्याच्या साहित्याने कडी तोडत असताना शेजारील महिलेला आवाजाने चोर आल्याचे जाणवले व तिने मदतीसाठी हाक दिली. परिसरातील तरुणांनी तात्काळ त्या चोरटय़ांचा पाठलाग सुरू केला, तर गस्तीसाठी असलेल्या पोलिसांनी चोरटय़ांच्या दिशेने धाव घेतली.
रहिवाशांनी या तिघांपैकी महम्मद खान यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महम्मद याच्या विरोधात घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मूळचा दिल्लीतील राहणारा आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्यातून देण्यात आली.