ठाणे – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आकाश मराठे याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – मूल होत नसल्याने पत्नीची हत्या, अंबरनाथमधील घटना, आरोपी पतीला अटक
तक्रारदार हे वादक म्हणून काम करतात. रविवारी ते वादन करण्यासाठी कल्याण येथे गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना त्यांना ठाण्यातील कोलशेत जवळील आझाद नगर भागात त्यांचा मित्र आकाश मराठे हा भेटला. आकाशने त्यांच्याकडे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे मागितले. त्यास तक्रारदार यांनी नकार दिला असता आकाश याने त्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर आकाश याने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.