डोंबिवली- ‘पत्नीला गंभीर आजार झाला आहे. वैद्यकीय उपचार करण्यासाठी जवळ पैसे नाहीत. यासाठी जवळील सोन्याची बिस्किटे ठेऊन घ्या आणि त्या बदल्यात रोख रक्कम द्या,’ असे सांगून दोन भामट्यांनी सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे एका व्यावसायिकाला दिली. व्यावसायिकाने त्या वस्तूच्या बदल्यात दोन लाख रुपयांची रक्कम भामट्यांना दिली. ती बिस्किटे पितळी वस्तूची असल्याचे निदर्शनास व्यावसायिकाच्या भामटे निघून गेल्यावर निदर्शनास आले.

मिथुन चव्हाण (२७) हा डोंबिवली एमआयडीसीतील ममता रुग्णालयाजवळ राहतो. तो व्यावसायिक आहे. डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्त्यावरील नाका कामगार उभे राहत असलेल्या ठिकाणी मिथुन उभा होता. तेथे दोन इसम आले. त्यांच्यापैकी एकाने मिथुन चव्हाण यांना विनंती केली. ‘माझी पत्नी गंभीर आजारी आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. माझ्या जवळ सोन्याची बिस्किटे आहेत. ती तुम्ही घेऊन त्या बदल्यात मला तुम्ही दोन लाख रुपये द्या,’ असे सांगितले.

सोन्याची बिस्किटे पाहून मिथुन यांना कमी किमतीत सोन्याची वस्तू मिळते म्हणून त्यांनी दोन अनोळखी व्यक्तिंजवळील सोन्याच्या वस्तूंची पारख न करता, तातडीने सोन्याची बिस्किटे ताब्यात घेतली. त्या बदल्यात दोन इसमांना दोन लाख रुपयांची रक्कम दिली. दोन्ही इसम निघून गेल्यानंतर एका जवाहिराकडे मिथुन यांनी सोन्याच्या बिस्किटांची वास्तवता तपासली. त्यावेळी त्यांना ही बिस्किटे सोन्याची नाहीत. ती बनावट आहेत. या बिस्किटांना वरून फक्त पिवळी लकाकी लावण्यात आली आहे. असे सांगितले. दोन इसमांनी आपल्या जवळ खोटी बतावणी करून आपणास फसविले आहे. हे लक्षात आल्यावर मिथुन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन दोन अज्ञात भामट्यांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.