चारित्र्याच्या संशयावरून कृत्य
चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची भरदिवसा रस्त्यात हत्या केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने अब्दुल रेहमान सैयद (३०) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येच्या आरोपातून अब्दुलच्या शेजारी राहणाऱ्या खान दाम्पत्याची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुंब्रा येथील कौसा भागातील अल्तमास कॉलनीत राहणारा अब्दुल सैयद आपली पत्नी यास्मीन हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. २३ जून २०११ रोजी अब्दुलचे त्याच्या पत्नीसोबत पुन्हा भांडण झाले. या भांडणानंतर यास्मीनने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पत्नीची समजूत काढण्यासाठी अब्दुलने त्याच दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनीही दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र यास्मीन काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अब्दुलसोबत घटस्फोट घेऊन माहेरी राहण्याचा निर्णय तिने घेतला होता. त्यामुळे ती घरातून कपडे घेऊन माहेरी जाण्यासाठी निघाली. त्याच वेळी अब्दुलने तिच्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा खून झाला, त्या वेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. भरदिवसा रस्त्यात ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होता. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अब्दुलला अटक केली होती. तसेच अब्दुलच्या शेजारी युनीस खान आणि त्याची पत्नी रशीदा हे दाम्पत्य राहत असून हे दाम्पत्य अब्दुलला पत्नीसोबत भांडण करण्यासाठी भडकवीत होते. यामुळे या गुन्ह्य़ात खान दाम्पत्यालाही अटक करण्यात आली होती.