केंद्र सरकारने ‘संजीवनी आरोग्य’ योजना सुरू केली आहे. या योजनेला महाराष्ट्र आणि गोवा सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठसठशीत छबी वापरून या योजनेच्या माध्यमातून नोकरी देण्याच्या बहाण्याने डोंबिवलीतील एका सुशिक्षित तरुणाची एका टोळीने ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने सामान्यांसाठी, बेरोजगारांसाठी अनेक योजना जाहीर होत आहेत. त्या योजनेतील हा भाग असावा असा भास व्हावा अशा पद्धतीने ही नोकरी देणारी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. या कागदपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र आहे. राजमुद्रा, भारतीय जीवन विमा निगम, केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या नावाने बनावट शीर्षकपत्रक (लेटरहेड) तयार करण्यात आली आहेत. स्टेट बँकेच्या माध्यमातून या टोळीने हे पैसे उकळले आहेत. या फसवणूकप्रकरणी राजेश कणेरे यांनी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे एप्रिलमध्ये तक्रार केली होती. ही तक्रार या विभागाने विष्णूनगर विभागाकडे वर्ग केली आहे.
राजेश कणेरे (२५) यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. ते डोंबिवलीत राहतात. तीन महिन्यांपूर्वी राजेश यांच्या कोकणातील घरी स्पीड पोस्टाने एक दहा पानांचे पत्रक असलेले पाकीट आले. पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांवर राजमुद्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी, केंद्र, राज्य सरकारची शीर्षकपत्र, एलआयसीची कागदपत्रे जोडण्यात आली होती. या कागदपत्रांमध्ये राजेश कणेरे यांना ‘दूरध्वनीचालक’ म्हणून संजीवनी आरोग्य योजनेत नोकरी देण्यात आल्याचे पत्र होते.
नोकरी मिळणार म्हणून राजेशने तातडीने पत्र आलेल्या पत्त्यावर संपर्क साधला. तेथील सुनील सक्सेना, प्रिया शर्मा यांनी राजेश यांना अरुण कुमार यांच्या स्टेट बँकेतील खात्यात ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले. मात्र तरीही नोकरी मिळत नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजेशने ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन तक्रार केली.

——-

गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई
ठाणे – राज्य शासनाने गुटखा विक्री तसेच साठय़ावर बंदी घातलेली असतानाही त्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत मोठय़ा प्रमाणात गुटखा तसेच पान मसालाच्या साठा जप्त करण्यात आला असून या विक्रीप्रकरणी दुकानदारांना अटक करण्यात आली आहे. वागळे इस्टेट येथील गांधीनगर भागातील लक्ष्मी जनरल स्टोअर्समध्ये गुटखा सापडला आहे.
याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानदार शैलेश जैनला अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा विक्रीप्रकरणी जगदीश भावनानी, प्रकाश परियानी, नरेश भावनानी, रामनारायण बबलू गुप्ता आदी दुकानादारांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वाना अटक करण्यात आली आहे.

तरुणीचा विनयभंग
ठाणे – बाळकुमपाडा परिसरात रहाणारी २१ वर्षीय तरुणी सॅटीस पुलावर बस पकडण्यासाठी उभी होती. त्यावेळी आरोपी चंद्रकांत बाळकृष्ण तुपे (३२) याने तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच पोलीस गणवेशातील त्याचे छायाचित्र तिच्या हातात दिले आणि पोलीस असल्याचे सांगून तक्रार केल्यास बदला घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीत चोरी
ठाणे – कल्याण शिळफाटा रोडवरील पडले गावातील रोहीत डेव्हर्लपर्स कंम्पाऊंडमधील नंदा ट्रान्सफामर्स प्रा. लिमिटेड कंपनीतील ट्रान्सफामर्सचे वरच्या बाजुचे नटबोल्ट खोलून चोरटय़ांनी त्यातील तांब्याची तार, ऑईल व इतर सामान असा एकूण ४ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला.

दोन रिक्षा लंपास
डोंबिवली – पूर्वेतील विजयनगर आयरेगावातील रिक्षाचालकाने याच भागातील महापालिका शाळेसमोर उभी केलेली रिक्षा चोरीस गेली. तसेच या रिक्षा शेजारी उभी असलेली दुसरी रिक्षाही चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या दोन्ही रिक्षांची किंमत प्रत्येकी सुमारे ७० हजार रुपये होती.

एमएसईबीच्या कर्मचाऱ्यास मारहाण
ठाणे  – दिवा येथील कुलस्वामिनी मंदिरापुढे विजेची तार रोडवर पडली असल्याची तक्रार आल्याने एमएसईबी कार्यालयातील ५७ वर्षीय कर्मचारी घटनास्थळी पहाणीसाठी गेले. पहाणीनंतर तेथून कार्यालयात परतत असतानाच विशाल एकनाथ भगत यांनी त्यांना अडविले आणि येथे वारंवार विजेची तार तुटून लाईट जाण्याची घटना घडते. यावर कायमस्वरुपी उपाय करुनच जा, त्याशिवाय जाता येणार नाही अशी धमकी देऊन त्यांना मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विशाल भगत यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.