मीरा रोडच्या धार्मिक स्थळांना शासनाच्या नोटिसा
भाईंदर : शहरातील धार्मिक स्थळावर मराठी पाट्या लावणे अनिवार्य असल्याचे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातून देण्यात आले आहे. त्यानुसार मीरा रोड येथील चार धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन शासकीय कामकाजातही मराठी भाषेचाच वापर करण्याचे आदेश दिलेले आहेत. शासनाच्या धोरणानुसार मराठी भाषेत नामफलक असणे आवश्यक आहे. असे असतानाही मीरा रोड येथील चार धार्मिक संस्थांनी महाराष्ट्र शासनाकडे नोंदणी करूनही संस्थांचे नामफलक मराठी भाषेत लावले नाहीत. याबाबत मराठी एकीकरण समितीचे निनाद सावंत यांनी धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरून धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र शासन सार्वजनिक न्यास नोंदणी ठाणे कार्यालयाच्या अधीक्षक न्याय शाखा यांनी मीरा रोड शांतीनगर सेक्टर ६ येथील अचलगच्छ जैन संघ, श्री गुरुनानक दरबार शांतीनगर सेक्टर ६, सेंट थॉमस चर्च साईबाबा नगर, हनुमान मंदिर संस्था शांतीनगर सेक्टर ४ या चार संस्थांना न्यासाचे नामफलक मराठी भाषेत व ठळक अक्षरात लावण्यात यावेत, सदर नामफलक मराठी भाषेत लावल्याबाबत या कार्यालयास अवगत करावे अशी नोटीस बजावली आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नियमांचे सर्रास उल्लंघन सुरूच
मीरा-भाईंदर शहरातील दुकानावरील पाट्या मराठी भाषेत लावण्याचे पालिका प्रशासनाचे सक्त आदेश आहेत. मात्र असे असताना देखील नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यासंदर्भात मराठी एकीकरण समितीतर्फे वारंवार आंदोलनदेखील करण्यात येते.
