ज्येष्ठांना आणि तरुण रसिकांना आपल्या आशयात्मक कवितांमुळे कायम स्मरणात असलेले कविवर्य मंगेश पाडगावकर लहान मुलांनाही आपलेसे वाटावेत यासाठी डॉ. अरुंधती भालेराव संचालित प्रारंभ कला अकादमीतर्फे बालनाटय़ोत्सवाचे आयोजन ८ मे रोजी गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे. बालनाटय़ोत्सवात लहान मुले नाटिका आणि नृत्याद्वारे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या निवडक कवितांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच ‘व्हॉट्सअ‍ॅपचा तमाशा’ असे लोकनाटय़ सादर करत हरवत चाललेला संवाद यावर लहान मुले आपल्या अभिनयातून भाष्य करणार आहेत.
प्रारंभतर्फे दरवर्षी लहान मुलांच्या भावविश्वाशी साधम्र्य साधणारे विषय बालनाटय़ाच्या माध्यमातून मांडण्यात येतात. यंदाचे बालनाटय़ोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. सहा ते पंधरा वयोगटातील मुलांना पाडगावकरांच्या कविता तोंडपाठ व्हाव्यात, कवितांमधील गम्मत बालदोस्तांना कळावी यासाठी सात कवितांची निवड करण्यात आली आहे. धमाल जेवण, माझ्या वर्गातला वाघोबा, परीराणी, माझ्या परीचे गाणे, छोटय़ा मावळ्यांचे गाणे, प्रार्थना, घुसगावचे उंदीर अशा पाडगावकरांनी लिहिलेल्या कवितांवर नृत्यनाटय़ाचे दिग्दर्शन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले आहे. डॉ. पराग घोंगे यांनी बालनाटय़ाचे लेखन केले आहे. तसेच डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी निवडक कवितांना संगीत दिले असून डॉ. अनघा वझे यांनी पाश्र्वगायन केले आहे.