ठाणे : बनावट फेसबुक खाते तयार करून अल्पवयीन मुलींशी मैत्री वाढवत त्यांना अश्लील संदेश, फोटो व चित्रफिती पाठवून मानसिक छळ करणाऱ्या तरुणाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मंगेश ईश्वरदास तांबे (२८) असे दोषीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ (अ) अंतर्गत त्याला ८ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर भादंवि कलम ३५४ (अ) विनयभंग प्रकरणी अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिवाय, दंडाची रक्कम पीडितांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सागरी उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तांबे याने डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत विद्या या नावाने बनावट खाते तयार केले. त्यानंतर एका तरुणीला मैत्रीची विनंती पाठवली. मुलगी असल्याचे समजून पीडित तरुणीने विनंती स्वीकारली. ओळख वाढल्यानंतर आरोपीने फेसबुकवरून पीडितेला अश्लील छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली. संशय आल्याने तरुणीने आरोपीशी व्हिडीओ कॉलवरून संपर्क साधला असतो विद्या नावाने संवाद साधणारी व्यक्ती ही पुरुष असल्याचे उघड झाले. त्यामुळे पीडितेने आरोपीचा मोबाइल क्रमांक ‘ब्लॉक’ केला.
त्याचा राग मनात धरून आरोपीने त्यानंतर फिर्यादी तरुणीच्या नावानेच बनावट फेसबुक खाते तयार केले. या खात्यावरून तिच्या चुलत बहिणीसह तिच्या अल्पवयीन मैत्रिणींना अश्लील संदेश, छायाचित्र व चित्रफिती पाठवण्यास सुरुवात केली. आरोपीने मुलींना धमकावत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले. या प्रकाराला कंटाळून अखेर फिर्यादीने सागरी उत्तन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील श्रीमती भामरे पाटील यांनी बाजू मांडली. आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने नऊ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे व इतर कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार दिलीप सनेर यांनी सहकार्य केले. माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ (अ) अंतर्गत ठोठावण्यात आलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीसोबत ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
