पालिकेच्या पर्यावरण अहवालात सद्यस्थिती उघड
ठाण्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवली शहरांच्या परिघात येणाऱ्या खाडीकिनारी तिवरांच्या जंगलांची बेसुमार कत्तल होत असून वाढती बेकायदा बांधकामे आणि त्याकडे होत असलेल्या शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक निष्कर्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदविण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने खारफुटीचे संवर्धन करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर पर्यावरण विभागाने नोंदविलेल्या काही निष्कर्षांमुळे महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निष्क्रियतेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरातील खाडीकिनारा, पाणथळ भागातील भोपर, कोपर, रेतीबंदर, मोठागाव, गरीबाचा पाडा, कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली, पत्रीपूल, उंबर्डे, गंधारे परिसरात एकेकाळी मोठय़ा प्रमाणात तिवरांची विस्तीर्ण अशी जंगले होती. खारफुटीमुळे जमिनीची धूप थांबते. त्याचबरोबर खारफुटीच्या झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात. त्यामुळे भूजल पातळी समतल ठेवण्यास ही झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. मागील दहा वर्षांपासून मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत खाडीकिनारी बेसुमार बेकायदा बांधकामांची उभारणी सुरू झाली आहे. या बांधकामांनी तिवरांच्या जंगलांना अक्षरश: गिळून टाकल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या पर्यावरण अहवालात देण्यात आली आहे.
खारफुटी नष्ट करणाऱ्या भूमाफियांवर, विकासकांना चेव चढल्याचे चित्र या अहवालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खारफुटी तोडून नष्ट करण्यात आलेल्या भोपर, कोपर पट्टय़ातील बांधकामांच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा दौलतजादा केला असल्याची माहिती काही भूमाफियांकडून आकडेवारीसह देण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार वाढला आहे. पण त्याविषयी पालिकेकडून कोणतीही भूमिका घेतली जात नाही. या विषयाकडे आता पर्यावरण अहवालाने लक्ष वेधल्याने आयुक्त ई. रवींद्रन अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खारफुटींचे वास्तव..
* सुरुवातीच्या काळात रासायनिक द्रव्य, पिवळी मरवेल खारफुटीच्या झाडांवर टाकून ही जंगले मारली जात होती. अलीकडच्या काळात यांत्रिक करवत वापरून रात्रीच्या वेळेत खारफुटीच्या अवाढव्य झाडांचा बळी घेण्यात येत आहे.
* वाळू तस्करांकडून तिवरांच्या जंगलांची राजरोसपणे कापणी सुरू आहे.
* बऱ्याचशा भागात खारफुटीची मोठय़ा प्रमाणावर कत्तल झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
* शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे खारफुटीची जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.