वन विभागाकडून अखेर गुन्हा दाखल

किशोर कोकणे
ठाणे : मुंब्रा येथील देसाई खाडीत दोन किलोमीटर लांब रस्ता बांधण्यासाठी खारफुटींची कत्तल केल्याप्रकरणी वन विभागाने अखेर एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या खाडीत २.४५ हेक्टर जागेत खारफुटींचे क्षेत्र नष्ट झाल्याचे वन विभागाने तक्रारीत म्हटले आहे. रस्त्याच्या बांधकामामध्ये वाळू आणि भूमाफियांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे.

मुंब्रा-दिवा येथील देसाई खाडी भागात टाळेबंदीच्या कालावधीत भूमाफियांनी खारफुटींची कत्तल करून खाडीतच सात फूट रुंद, खाडीपात्रापासून १० फूट उंच आणि दोन किलोमीटर लांब रस्ता तसेच त्यालगत एक संरक्षण भिंत तयार केली. खाडीचे क्षेत्र महसूल विभागाकडून वन विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली. त्या वेळी पाहणीमध्ये खारफुटींची सोनचिप्पी, तिवर या प्रजाती नष्ट झाल्याचे दिसून आले. तर करंजवेल ही खारफुटीच्या सहयोगी वेलींनाही हानी झाल्याचे समोर आले. हे क्षेत्र राखीव वन क्षेत्र जाहीर झाल्याने सोमवारी रात्री वन विभागाने या प्रकरणी गणेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पाटील यांनी रस्त्याकडेला संरक्षण भिंत उभारल्याचे आढळून आले. त्यांना अद्याप अटक झाली नसल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

दरम्यान, भूमाफियांनी खाडीतील २.४५ हेक्टर जागेमधील खारफुटींची हानी केल्याचे वन विभागाच्या तपासामध्ये समोर आले आहे. तसेच रस्ता बांधताना १० हजार डम्पर भरून राडारोडा खाडीत आणि खारफुटींवर टाकण्यात आला आहे. हे काम एका व्यक्तीचे नसू शकते. वन विभागाने केवळ एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वन विभागाने इतर आरोपींचाही शोध घ्यावा, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांकडून केली जात आहे.

पुनरेपण कठीण

खाडीत बांधण्यात आलेला रस्ता दोन किलोमीटर लांब आहे. तसेच राडारोडाही मोठय़ा प्रमाणात टाकला गेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात खारफुटीचे पुनरेपण करणे कठीण असल्याची माहिती एका वन अधिकाऱ्याने दिली. राडारोडा टाकून करण्यात आलेल्या रस्त्यावर आता रानभेंडी आणि करंज या वनस्पतीची लागवड करण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जाणार आहे.

देसाई खाडीतील खारफुटीच्या कत्तलीप्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

– चेतना शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी, भिवंडी, मुंबई कांदळवन संधारण घटक खारफुटी हटवून रस्ता तयार करण्यात आला आहे.