New year 2026: ठाणे – २०२६ हे वर्ष सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे या नववर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सण, उत्सव, ग्रहणे, कुंभमेळा यांसह अनेक खगोल व पंचांगविषयक घडामोडी २०२६ मध्ये घडणार असून याविषयी पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नवीन वर्षाची दिनदर्शिका हाती घेताच सुट्ट्यांकडे पाहिले जाते. मात्र २०२६ मध्ये महाशिवरात्र आणि लक्ष्मीपूजन यांसारखे अनेक सण रविवारी किंवा एकच दिवशी आल्याने नोकरदारांच्या सुट्ट्यांमध्ये कपात होणार आहे. महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा एकाच दिवशी, १ मे रोजी साजरे होणार आहेत. तसेच स्वातंत्र्यदिन आणि पारसी नववर्ष १५ ऑगस्ट रोजी एकत्र येत आहेत.

चार ग्रहणे, एकच भारतातून दृश्यमान

नूतन वर्षात एकूण चार ग्रहणे होणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, ३ मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण, १२ ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण आणि २८ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यापैकी केवळ ३ मार्चचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

गुढीपाडवा उशिरा, सण एकाच दिवशी

चैत्र शुक्ल प्रतिपदेची क्षय तिथी असल्याने अमावास्या संपल्यानंतर १९ मार्च रोजी सकाळी ६.५३ नंतरच गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे. २०२६ मध्ये हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी येत आहेत. दिवाळीतही नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी साजरे होणार आहेत.

ज्येष्ठ अधिकमासामुळे सण उशिरा

१७ मे ते १५ जून या कालावधीत ज्येष्ठ अधिकमास असणार आहे. त्यामुळे वर्षातील बहुतांश सण-उत्सव उशिरा येणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे महापर्व

दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुरू होणार आहे. यंदा गुरू ग्रह वक्री-मार्गी झाल्याने तीन वेळा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा अनुभवायला मिळणार आहे.

हा कालावधी पुढीलप्रमाणे असेल –

३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ मार्च २०२७

२५ जून २०२७ ते २६ नोव्हेंबर २०२७

२८ फेब्रुवारी २०२८ ते २४ जुलै २०२८

अंगारकी चतुर्थी, गुरुपुष्यामृत योग

गणेशभक्तांसाठी आनंदाची बाब म्हणजे ६ जानेवारी, ५ मे आणि २९ सप्टेंबर अशा तीन अंगारकी चतुर्थी २०२६ मध्ये येत आहेत. सुवर्ण खरेदीसाठी २३ एप्रिल, २१ मे आणि १८ जून असे तीन गुरुपुष्यामृत योग लाभणार आहेत.

विवाह मुहूर्त कमी

विवाहेच्छुकांसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरणार आहे. अधिकमास, गुरू-शुक्र अस्त, चातुर्मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे विवाह मुहूर्त अत्यल्प आहेत. जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे काढीव किंवा गौण मुहूर्तांवरच विवाह करावे लागणार आहेत.

ब्ल्यू मून आणि सुपरमून

३१ मे २०२६ रोजी ब्ल्यू मून योग येणार असून २४ डिसेंबर २०२६ रोजी सर्वांना सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.