नौपाडा, शिळ-डायघर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांतील अनेक कर्मचाऱ्यांची सायकल धाव
किशोर कोकणे लोकसत्ता
ठाणे : असंतुलित आहार आणि कामाचा अतिरिक्त ताण यांमुळे राज्यातील पोलीस दलात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना पोटाचा घेर वाढणे, वजन वाढणे या समस्या भेडसावत असतात. व्यायामाकडे पाठ फिरवून तब्येतीची हेळसांड करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठाणे पोलीस दलातील ठरावीक अधिकाऱ्यांची सायकल रपेट सध्या कमालीची प्रेरणदायी ठरू लागली आहे.
करोना काळात आपल्या सहकाऱ्यांना उत्तम आरोग्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी नौपाडा, शिळ-डायघर तसेच मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घर ते पोलीस ठाणे असा प्रवास शासकीय वाहनाऐवजी सायकलवरून सुरू केला असून ही रपेट ठाणे पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी विविध प्रकारे त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते. मात्र कालांतराने अनेक कर्मचाऱ्यांची ही सवय सुटते. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पोटाचा घेर वाढतो, वजन वाढते, दम लागणे काहींना चालतानाही त्रास होत असतो. करोना काळात ठाणे पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली. . त्यामुळे नियमित व्यायाम आणि योग्य वेळी आहार घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली आणि त्याला त्यांना यश आले.
पोलिसांकडून सायकल रपेट
’ मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (५२) यांना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच करोना झाला. कड हे त्यापूर्वीही नियमित व्यायाम करायचे. त्यामुळे करोनातून ते तात्काळ बरे झाले. नियमित व्यायामुळे मी या आजारातून लवकर बरा झालो. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही व्यायामाची आवड लागावी यासाठी त्यांना नियमित व्यायाम आणि सायकल रपेटीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या पोलीस ठाण्यात करोनातून बरे झालेले आठ सहकारी नियमित व्यायाम आणि सायकल चालवू लागले आहे. अनेकदा मी सायकल चालवित सकाळी कळवा खारेगाव ते दादर गाठत असतो, असेही त्यांनी सांगितले.
’ नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि नवी मुंबईत राहणारे रवींद्र क्षीरसागर (४९) हे २००६ पासून सायकल चालवित आहेत. त्यांनी अनेक सायकल स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक पटकावली आहेत. आठवडय़ातून तीन दिवस ते १५० ते २०० किलोमीटर सायकल चालवितात. सरकारी वाहन असूनही ते नवी मुंबई येथील पाम बीच परिसरातून नौपाडा पोलीस ठाण्यात सायकल चालवित येतात. त्यानंतर आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी सायकलने येऊ लागले.
’ शिळ डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव (५३) हे गेल्या तीन वर्षांपासून सायकल चालवित आहेत. ते पूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना संपूर्ण हद्दीत पहाटेच्यावेळी पायी गस्ती घालण्यास सांगितली होती. संपूर्ण हद्दीत पायी गस्त घालणे शक्य नसल्याने त्यांनी सहकाऱ्यांसोबत सायकलने गस्ती घालण्यास सुरुवात केली होती. या गस्तीमुळे शहरातील सोनसाखळी चोरीचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते.
