ठाणे/ मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर हिणकस मजकूर प्रसारित करणारी टिव्ही मालिकांतील दुय्यम नटी केतकी चितळे हिला रविवारी ठाणे न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मुंबईतही तिच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर टिकेची झोड सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी शनिवारी तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती. रविवारी सकाळी तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. या मजकुराखाली वकील नितीन भावे असा उल्लेख आहे. त्यामुळे नक्की हा मजकुर केतकीने लिहिला आहे की आणखी कोणी, तसेच नितीन भावे ही व्यक्ती नक्की कोण आहे, याचा तपासही सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. केतकी हिच्यावर मुंबईतही तीन गुन्हे दाखल झाले आहेत. भोईवाडा, गोरेगाव व गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.