ठाणे : आशिया खंडातील पहिले मराठी पुस्तकांचे ग्रंथालय म्हणून मान असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सांस्कृतिक वारशात आता आणखी एका महत्त्वपूर्ण पर्वाची भर पडणार आहे. संग्रहालयातील वा. अ. रेगे सभागृह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिनी नाट्यगृहाच्या स्वरूपात विकसित करण्यात येणार असून, नाटक, प्रायोगिक रंगभूमी, संगीत, नृत्य, साहित्य आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे सभागृह नव्या युगाचे सक्षम सांस्कृतिक व्यासपीठ ठरणार आहे.अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, परिणामकारक प्रकाशयोजना, वातानुकूलन आणि सुसज्ज रंगमंचाच्या सुविधांमुळे ठाण्याच्या समृद्ध सांस्कृतिक विश्वाला आधुनिकतेची नवी झळाळी लाभणार आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालयात वर्षभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रमांची अखंड रेलचेल असते. साहित्यप्रेमी, रंगकर्मी, कलाकार आणि रसिकांच्या सततच्या वर्दळीने गजबजलेल्या या संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील सुमारे २०० आसनक्षमतेच्या वा. अ. रेगे सभागृहाला आता संपूर्णपणे आधुनिक स्वरूप प्राप्त होणार आहे. नाटक, प्रायोगिक रंगभूमी, नृत्याविष्कार, संगीत मैफिली, व्याख्याने, साहित्यिक कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावी, दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने सादर करता यावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या नूतनीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या व्यापक नूतनीकरणामध्ये अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना, वातानुकूलित सभागृह, प्रशस्त व सुसज्ज रंगमंच तसेच कलाकारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बॅकस्टेज सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. परिणामी, नाट्यप्रयोगांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण अधिक प्रभावी, दर्जेदार आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरेल. आगामी ११ जुलै रोजी या सभागृहात अखेरचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ होईल. हे काम सुमारे दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पावसाळ्यानंतर नव्या रूपातील हे अत्याधुनिक सभागृह पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
वि. ल. भावे यांचा अर्धाकृती पुतळा उभारणार
आशिया खंडातील पहिल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचे संस्थापक, महाराष्ट्राच्या साहित्यविश्वातील मान्यवर सारस्वतकार वि. ल. भावे यांच्या कार्याला अभिवादन म्हणून ग्रंथालयाच्या तळमजल्यावर त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. १ जून १८९३ रोजी खारकर आळी येथे अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या ग्रंथालयाचा प्रवास पुढे जागेअभावी आ. रे. क्रीडा मंडळ येथे, त्यानंतर जिल्हा परिषदेजवळील बाजारपेठ परिसरात असा विविध टप्प्यांतून होत आजच्या भव्य स्वरूपापर्यंत येऊन पोहोचला आहे. या संपूर्ण वाटचालीत वि. ल. भावे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि मोलाचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्याची चिरंतन आठवण जपण्यासाठी हा अर्धाकृती पुतळा उभारला जाणार आहे. याचबरोबर ग्रंथालय परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार असून, प्रवेशद्वारावर ”मुक्तद्वार” या संकल्पनेची देखणी साकारणी करून ग्रंथप्रेमी आणि रसिकांचे अधिक चांगल्या वातावरणात स्वागत करण्याची योजना आखण्यात आली आहे.
