ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे मत
मराठी साहित्याचा उगम तेराव्या शतकातील संत साहित्यापासून झाला असून हा प्रवाह १७ व्या शतकापर्यंत प्रवाहित होता. त्यानंतर भारतामध्ये वसाहतवादाला सुरुवात झाली. त्यामुळे देशात आधुनिक साहित्याचे वारे वाहू लागले. या दोन्ही प्रवाहांचा कालखंड पाहिल्यास संत साहित्याला सुमारे ५०० वर्षांचा तर आधुनिक साहित्याचा कालखंड गेली दीडशे वर्षांचा आहे. आधुनिक साहित्याचा जन्म पाश्चात्त्य साहित्याच्या अनुकरणातून झाला असून त्यामुळे संत साहित्याशी असलेली नाळ तोडली गेली. तर आधुनिक काळातही ज्या साहित्यिकांनी संत साहित्याचा प्रभाव मान्य केला तेच साहित्यिक आजच्या काळातील श्रेष्ठ साहित्यिक मानले जात आहेत. त्यामुळे संत साहित्य हेच मराठी साहित्यातील मुख्य प्रवाह आहे, असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यातील बेडेकर महाविद्यालयात व्यक्त केले.
ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने बुधवारी ‘संत साहित्य आणि आपण’ या विषयावर संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ तत्त्वचिंतक आणि पंजाब येथील घुमान येथील ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. शकुंतला सिंग व्यासपीठावर उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संत साहित्याचा प्रवाह उलगडून दाखवला. विद्यापीठामध्ये संत साहित्य विभाग अत्यंत आकसलेल्या अवस्थेत दिसून येत असून त्याकडे बघण्याचा विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा दृष्टिकोनही संकुचित बनू लागला आहे. संत साहित्य शिकवण्याचे टाळण्यापर्यंत शिक्षकांची मजल गेली आहे. संत साहित्य हे आधुनिक साहित्यापासून पूर्णपणे वेगळे मानले जात असले तरी संत साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. संत साहित्याची एक परंपरा असून प्रत्येक संताने मागील संताच्याप्रती आदर व्यक्त केला असून त्यांचे उपकार मान्य केले आहेत. ज्या आधुनिक साहित्यिकांनी संत साहित्याशी नाळ बांधून ठेवली तेच साहित्यिक मराठीतील आधुनिक साहित्यिक म्हणून गणले गेले आहेत. त्यामध्ये मर्ढेकर आजच्या पिढीतील भालचंद्र नेमाडे असतील त्यांनी मराठीच्या मूळ प्रकृतीला धरून ठवले, असे मत मोरे यांनी बोलताना व्यक्त केले. संत साहित्य सांप्रदायिक, देवाशी, मोक्षाशी आणि भक्तीशी जोडलेले आहे म्हणून ते पुरोगामी नाही असे मानले असले तरी संत साहित्य हे लोकजीवनाशी जोडलेले आहे. त्यामुळेच ते आजही लोकांच्या वाचनात आहे, असेही ते म्हणाले.

दलित साहित्य हे अस्सल मराठी साहित्य
मराठी साहित्य पाश्चिमात्यांच्या अनुकरणाने निर्माण होऊ लागल्याने मराठी साहित्याला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही. आधुनिक साहित्याने मराठी साहित्य प्रकृतीशी असलेली नाळ तोडली, त्यामुळेच आधुनिक काळात अस्सल साहित्य निर्माण होऊ शकले नाही. मराठीचा विचार करता दलित साहित्य हेच खऱ्या अर्थाने अस्सल मराठी साहित्य आहे. त्याची निमिर्ती संत वाड्मयातून झाली आहे. आंबेडकर आणि फुले यांचे विचार सामाजात रुजवण्यासाठी मराठीमध्ये संतांनी पाश्र्वभूमी तयार करून ठेवली होती. त्यामुळे हे विचार या समाजात स्वीकारले गेले, असेही मोरे यांनी सांगितले. उत्तर भारतामध्ये संत परंपरा निर्माण करण्यात नामदेवांनी प्रयत्न केले, तर भगवत्गीतेवर सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठीमध्येच विश्लेषण निर्माण झाले. त्यामुळे गीतेवर मराठीत सर्वाधिक प्रयोग झाल्याचे उदाहरण मोरे यांनी दिले.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी