मराठीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांनाच परवाने देण्याचा परिवहन विभागाचा निर्णय
प्रत्येक रिक्षाचालकाला मराठी आले पाहिजे आणि त्याने प्रवाशांशी मराठीतूनच संवाद साधायला पाहिजे, यासाठी वसईतील परिवहन विभागाने मराठी मोहीम हाती घेतली आहे. रिक्षा परवाने वाटप करताना परिवहन विभागाने आता चालकांची मराठीची मौखिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रिक्षाचालकांना मराठी पुस्तकातील दहा ओळींच्या परिच्छेदांचे वाचन करावे लागणार आहे. २९ फेब्रुवारीपासून परवाने वाटप करताना ही चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरणही केले जाणार आहे. स्थानिकांना परवाने वाटप करताना डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असताना हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
गेल्या महिन्यात मुंबईसह राज्यात ४२ हजार ८९८ रिक्षा परवाने लॉटरी पद्धतीने जाहीर करण्यात आले होते. ऑटोरिक्षा पात्रतेसंदर्भात दिलेल्या अटींनुसार अर्जदारास मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे परवान्यांचे वाटप करताना उमेदवारांची मराठीची मौखिक चाचणी घेतली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व विभागीय परिवहन खात्याला देण्यात आल्या आहेत.
२९ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत मराठीची मौखिक चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पत्रकारांची नेमणूक करण्यात येणार आहे. पत्रकार आणि साहाय्यक मोटार निरीक्षकांच्या उपस्थितीत ही चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीसाठी मराठी पुस्तकातील दहा ओळींच्या परिच्छेदांचे वाचन करण्यास सांगितले जाणार आहे. अशिक्षित उमेदवारास रिक्षा प्रवाशांच्या संवादातील आणि भौगोलिक माहितीशी संबंधित दहा प्रश्न विचारले जाणार आहेत. यशस्वी उमेदवारांना त्याच दिवशी इरादापत्राचे वाटप केले जाणार आहे. प्रतिदिन पन्नास उमेदवार याप्रमाणे ही चाचणी होणार आहे.
परप्रांतीयांना रिक्षाचे परवाने मोठय़ा संख्यने दिल्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. केवळ मराठी बोलणारे
परप्रांतीय घेतल्याने मराठी स्थानिक तरुणांवरील अन्याय दूर होणार का, अशी प्रतिक्रिया स्थानिक रिक्षा संघटनांनी व्यक्त केली.