कल्याण – अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’ सिनेमाच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा क्षण सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे. असे या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते संतोष डावखर यांनी सांगितले.
‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यासारखे विविध भाषांमधील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती. डोंबिवलीत माणकोली उड्डाण पुलावर मागील वर्षी चित्रीकरण झालेल्या ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे भव्य निर्मितीमूल्य, मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ सिनेमाची निवड झाली आणि भारताचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला, असे निर्माते डावखर यांनी सांगितले.
गोंधळचा मराठी गाभा
‘गोंधळ’चा मूळ गाभा भारतीय मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमच्या चित्रपटावर विश्वास दाखवल्याबद्दल भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि ‘एफएफआय’च्या निवड समितीतील सर्व मान्यवर निवड समिती सदस्यांच्या निर्णयाबद्दल ‘गोंधळ’च्या पथकाने समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्याने प्रामाणिकपणे, व्यावसायिक निष्ठेने आणि जिवापाड मेहनत घेऊन हा चित्रपट उभा केला आहे, असे डावखर म्हणाले.
९९व्या अकादमी पुरस्कारांसाठीचे आमचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, सक्षम आणि प्रभावी कृतीआराखडा तयार करण्यात आला आहे. ‘गोंधळ’ पाच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि जगभरातील प्रदर्शनाच्या तारखा आम्ही लवकरच अधिकृतपणे जाहीर करू, असे डावखर यांनी सांगितले.
लेखक, दिग्दर्शक, निर्माते असलेले संतोष डावखर ज्येष्ठ विकासक आहेत. आपला बांधकाम व्यवसाय करत ते साहित्य, संस्कृती, कला, निसर्ग संवर्धन, प्राणी, पक्षी संवर्धनाचे विविध उपक्रम दरवर्षी राबवत असतात. लेखक संतोष डावखर यांच्या संकल्पनेतून गोळवली भागातील त्यांच्या प्रशस्त कार्यालयाच्या आवारात भरविण्यात येणारी विविध प्रकारची प्रदर्शने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते.
‘गोंधळ’ सिनेमा मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शित केला जाणार आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट स्वतः पाहावा, आपल्या कुटुंबीयांना व मित्रांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि भारताच्या या ऑस्कर प्रवासाचा अभिमानाने भाग व्हावे, असे आम्ही नम्र आवाहन करतो. प्रेक्षकांचा प्रत्येक प्रतिसाद आणि प्रत्येक तिकीट भारताच्या ऑस्कर अभियानाला अधिक बळ देईल. – संतोष डावखर दिग्दर्शक.
