सध्याचा तरुण नाटकांपासूनच नव्हे, तर कुटुंबापासूनही तुटला आहे. त्यामुळे कुटुंबासह तो नाटय़गृहात नाटक पाहण्यासाठी येईलच असे नाही. तरुणांनी त्यांना हवा त्या प्रकारचा रंगमंच बनवला असून त्यामध्ये ते गुंतून गेले आहेत. तरुणांना नाटकांपर्यंत आणायचे असेल तर नाटकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी विपणनाचा (मार्केटिंग) प्रभावी वापर करायला हवा.तरच मराठी नाटकांकडे तरुणांचा कल वाढू शकेल, असा सूर संमेलनाच्या व्यासपीठावरून मान्यवरांनी व्यक्त केला.
ठाण्यातील ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या परिसंवादामध्ये तरुण पिढीचा नाटकांकडे असलेला कल उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे’ या विषयावरील परिसंवादामध्ये अद्वैत दादरकर, प्रेमानंद गज्वी, राजन बने, जयंत पवार यांनी संवादामध्ये भाग घेतला, तर संवादकांची भूमिका विजू माने यांनी निभावली. नोकरी, प्रेमभंग, करिअर आणि माध्यमक्रांती अशा तरुणांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नसल्याने तरुण प्रेक्षक नाटकाकडे वळताना दिसत नाही. नाटय़निर्माते संपूर्ण कुटुंबाला एकाच वेळी पाहता येईल अशी नाटके सादर करण्यास प्रोत्साहन देत असल्याने नवे प्रयोग करण्याकडे निर्माते वळत नाहीत, असे मत प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले, तर अद्वैत दादरकर यांनी मराठी तरुणांचे एक वेगळे विश्व निर्माण झाले असून त्यांच्यामध्ये वाचणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. दुसऱ्यांची नाटके पाहण्याकडेही तरुणांचा कल नसल्याने त्यांना नवे प्रयोग होत असतानाही दिसत नाहीत, असे सांगितले. जयंत पवार यांनी मराठी रंगभूमी सुरुवातीपासूनच तरुणांची नव्हती, असे सांगितले. थिल्लरपणा, उथळपणा, भावनाप्रधान या सगळ्यांचा समावेश नाटकांमध्ये करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.