ठाणे : जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापनांच्या मालकांनी आपल्या आस्थापनांच्या नावाचे फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत लिहिणे बंधनकारक असल्याच्या स्पष्ट सूचना ठाणे कामगार उपायुक्त एस. एस. भोसले यांनी सर्व दुकानदार आणि व्यापारी आस्थापना मालकांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ च्या कलम ३५ अन्वये व्यापारी आस्थापनेच्या नावाचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा फलक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तसेच सदरचा फलक प्रदर्शित करताना मराठी भाषेतील या नामफलकावरील शब्दांचा आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. अशा पद्धतीची अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी अशा तरतुदी दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांसाठी लागू होत्या. मालकांनी आपल्या दुकानांची आणि आस्थापनांची नावे मराठी भाषेत देवनागरी लिपीत प्राथमिकतेने प्रदर्शित करण्याच्या सूचना कामगार उपायुक्त कार्यालयाने केल्या आहेत.
‘मद्यालयांना गडकिल्ल्यांची, महापुरुषांची नावे नकोत’
जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापनांना मराठी पाटय़ा बंधनकारक असल्याच्या सूचना देण्याबरोबरच मद्यविक्रीची दुकाने आणि मद्यालयांना शासनाच्या अधिनियमानुसार गडकिल्ल्यांची आणि महापुरुषांची नावे देता येणार नसल्याचेही जिल्हा कामगार उपायुक्त एस.एस.भोसले यांनी स्पष्ट केले आहे.