स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘उत्सव ७५ ठाणे’ अंतर्गत ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज १० किमी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ठाणे महापालिका मुख्यालयापासून शिवाईनगर ते पुन्हा ठाणे महापालिका मुख्यालय या मार्गावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नागरिकांनी आणि ठाणे पोलिसांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘उत्सव ७५ ठाणे’ अंतर्गत ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी सहा वाजता १० किमी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आणि पोलीसांची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट १८ वरील खुला गट), महिला (१६वर्षावरील खुला गट) असे दोन गट करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेची सुरुवात ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवन तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त झाली.

या मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटात प्रथम क्रमांक करण शर्मा, द्वितीय क्रमांक अनिल कोरवी, तृतीय क्रमांक निलेश मोरे, चतुर्थ क्रमांक विकास राजभर तर पाचवा क्रमांक प्रदीप यादव यांनी पटकाविला. महिला गटात प्रथम क्रमांक प्रियांका पाईकराव, द्वितीय क्रमांक रिया मोरे, तृतीय क्रमांक आदिती पाटील, चतुर्थ क्रमांक लक्ष्मी गुप्ता, तर पाचवा क्रमांक पुनम गुप्ता यादव यांनी पटकाविला. ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत याच मार्गावर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटात प्रथम क्रमांक रामनाथ मेंगाळ, द्वितीय क्रमांक प्रदीप भोय तर तृतीय क्रमांक योगेश वारे यांनी तर महिला गटात प्रथम क्रमांक शोभा देसाई, द्वितीय क्रमांक माया वाळूतेठे तर तृतीय क्रमांक धनश्री निकनके यांनी पटकाविले. त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी , सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, प्रशांत ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी १० किमीची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.

तसेच, या स्पर्धेत अनवाणी भाग घेऊन स्पर्धा पूर्ण करणारे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कर्मचारी तुषार दवणे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा, माजी महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मारूती खोडके, बाळासाहेब चव्हाण, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक रिमा देवरुखकर, माजी परिवहन सभापती विलास जोशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डी.पी. शिंदे, पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे, गणेश गावडे यांच्यासह ठाणे महापालिकेचे व पोलीस विभागाचे अधिकारी -कर्मचारी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव अशोक आहेर, प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते.

सायकल रॅलीचे आयोजन –

यावेळी सायक्लोथॉन (सायकल रॅली) सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला महापालिका भवन येथून सुरूवात होऊन कचराळी तलाव, हरिनिवास मार्गे, तीन हात नाका येथून परबवाडी येथील स्व. दादा कोंडके ॲम्पीथिएटर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत ५०० हून अधिक जण सहभागी झाले होते.

पोलिसांचा गाण्यावर ठेका –

मॅरेथॉन स्पर्धा संपल्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर ठाणे पोलिसांनी गाण्यांचा तालावर ठेका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

तर, मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटातून प्रथम क्रमांक पटकविल्यामुळे आनंद होत आहे. अशी प्रतिक्रिया प्रियंका पाईकराव यांनी दिली आहे.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon competition held in thane enthusiastic response from citizens including police msr
First published on: 14-08-2022 at 13:53 IST