गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे होऊ न शकलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे ठाणे महापालिकेने आयोजन केले असून रविवार, १४ ऑगस्ट रोजी १० कि.मीची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर सायक्लोथॉन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेकडून दरवर्षी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा करोना संकट कमी झाले असले तरी पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे यंदा तरी मॅरेथॉन स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम असतानाच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचेनिमित्त साधून पालिका प्रशासनाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धा ही ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. तसेच ठाणे पोलीसांची मॅरेथॉन सुद्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून याच ठिकाणी समाप्त होणार आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट १८ वरील खुला गट), महिला (१६ वर्षावरील खुला गट) असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात ठाणे महापालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धेतील पुरूष व महिला या दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १२ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ७ हजार रुपये, पाचव्या क्रमांकास ५ हजार रुपये, अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर यांच्याशी ९८२०४९७९३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर वर्षा सायक्लोथॉन स्पर्धेची सुरुवात कचराळी तलाव येथून सुरू होवून स्व. दादा कोंडके ॲम्पीथिएटर येथे समाप्त होणार आहे. सायकल रॅलीसंदर्भात अधिक माहितीसंदर्भात चिराग शहा यांचेशी ९६६४२३१२२० या क्रमांकावर संपर्क साधावा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉन व सायक्लोथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon competition of thane municipal corporation on sunday amy
First published on: 12-08-2022 at 10:20 IST