कॉसमॉस समूहाच्या कार्यालयावर रहिवाशांचा मोर्चा

भोगवटा प्रमाणपत्राअभावी २७२ कुटुंबांची परवड

भोगवटा प्रमाणपत्राअभावी २७२ कुटुंबांची परवड

घोडबंदर परिसरातील मानपाडा रस्त्यालगत असलेल्या कॉसमॉस लाउंज या गृहप्रकल्पातील तीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याने हैराण झालेल्या रहिवाशांनी शनिवारी कॉसमॉस समूहाच्या पाचपाखाडी येथील कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

सहा वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही बिल्डरने रहिवाशांना घरांचा ताबा दिला आहे. मात्र, भोगवटा प्रमाणपत्राअभावी बेकायदा असा शिक्का बसल्याने येथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. बिल्डरकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी अखेर शनिवारी मोर्चा काढत रस्त्यावरची लढाई सुरू केली.

कॉसमॉस समूहाचे प्रमुख सूरज परमार यांच्या आत्महत्येमुळे दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती. परमार यांच्या कंपनीचे काही प्रकल्प सुरुवातीपासून वादात सापडले असून, याच समूहामार्फत उभारण्यात आलेल्या कॉसमॉस लाउंज प्रकल्पातील रहिवाशांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही मागणी मान्य होत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी अखेर शनिवारी सकाळी क ॉसमॉस ग्रुपच्या पाचपाखाडी येथील कार्यालयावर मोर्चा नेला.

दंडाचा फटका

महापालिकेस दंडापोटी सात कोटी रुपयांचा भरणा करावयाचा असल्याने भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लांबली आहे, असे उत्तर या वेळी रहिवाशांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. दहा वर्षे चालणाऱ्या खटल्यामुळे आम्ही नाहक भरडले जात आहोत, असा सूर लावत या वेळी रहिवाशांनी अधिक आक्रमक होण्याचा इशारा संबंधितांना दिला. त्यानंतर मनीष मेहता यांनी महापलिकेच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे सांगून १० दिवसांचा वेळ रहिवाशांकडून मागितला आहे.

सूरज परमार यांनी आत्महत्या केली यात आमचा दोष नाही. आता आम्हालाही त्यांच्याप्रमाणे आत्महत्या करावी लागू नये यासाठी लवकरत लवकर भोगवटा प्रमाणपत्र द्यावे. – प्रेमकुमार रट्टा, रहिवासी, कॉसमॉस लाउंज

रहिवाशांकडून मी दहा दिवसांची मुदत मागितली आहे. कॉसमॉस लाउंजला भोगवटा प्रमाणपत्र लवकर मिळावे हा आमचाही प्रयत्न आहे. त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. रहिवाशांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. – मनीष मेहता, कॉसमॉस बांधकाम व्यावसायिक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: March on cosmos group office

ताज्या बातम्या