लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : भिवंडी येथील एका कापड गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. सुमारे चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
भिवंडी हे कापड गोदामांचे केंद्र आहे. या शहरातून राज्यासह देशातील विविध भागात कापड जात असतो. येथील राहनाळ गाव भागात कापड गोदाम आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. घटनेची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर भिवंडी, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यालगत गोदाम असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्रणांच्या साहाय्याने मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.