ठाणे : मागील दोन दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक मासुंदा (तलावपाळी) तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला असून, उपवन तलावातही पाण्याची पातळी वाढली आहे. तलावांचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच काही नागरिकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून पाण्यात उतरण्याचे प्रकार समोर आले आहेत.

पावसाळ्यात तलाव, धरणे आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढत असल्याने दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. असे असतानाही उपवन तलावात काही पर्यटक आंघोळ करण्यासाठी पाण्यात उड्या मारत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत वर्तक नगर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, तलावात उतरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी यासंदर्भातील चित्रफित देखील प्रसारित केली आहे. दरम्यान, ठाणे शहरात रविवारपासून पावसाचा जोर कायम असून सोमवारीही मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहत होते. या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून झाडे कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावातील पाण्याची पातळी वाढली होती. तलाव पूर्ण भरल्याने अतिरिक्त पाणी बाहेर पडून जांभळी नाका परिसरातील रस्त्यावर आणि लगतच्या बाजारपेठेत शिरले होते.

पावसाळ्यात तलाव भरल्यानंतर या परिसराचे सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी आणखी वाढते. मात्र, याच गर्दीत काही नागरिक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धोकादायक पद्धतीने पाण्यात उतरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

वर्तकनगर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपवन तलाव अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी केले आहे. उपवन तलावात यापूर्वी पावसाळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या काही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अपघात झाला आहे. ही बाब लक्षात घेता, तलाव परिसरात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आज उपवन तलावामध्ये काही नागरिक व मुलांकडून पाण्यात उड्या मारणे तसेच हुल्लडबाजी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेत वर्तकनगर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून त्यांना योग्य ती समज दिली.

नागरिकांनी उपवन तलावात पोहण्यासाठी किंवा पाण्यात उतरण्यासाठी जाऊ नये. तसेच पालकांनी आपल्या लहान मुलांना तलावाच्या सुरक्षा भिंतीजवळ किंवा लोखंडी ग्रीलच्या परिसरात जाऊ देऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी केले आहे.