कलानींचा पुन्हा दलबदल; सर्व समर्थकांच्या पक्षांतरामुळे उल्हासनगरमध्ये कलाटणी

राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत भाजप, रिपाइं आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षातील कलानी समर्थक २१ नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कलानी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

|| सागर नरेकर-नीलेश पानमंद

सर्व समर्थकांच्या पक्षांतरामुळे उल्हासनगरमध्ये कलाटणी; राष्ट्रवादीपासून सुरू झालेला प्रवास पुन्हा राष्ट्रवादीत

ठाणे : महापालिकेतील सत्तेत समान वाटा, विधानसभेचे तिकीट, महापौरपदाच्या आश्वासनावर पाच वर्षांपूर्वी भाजपच्या तंबूत शिरलेल्या उल्हासनगरच्या पप्पू कलानी समर्थक टीम ओमी कलानीने राज्यात महाआघाडीचे सरकार येताच महापौर निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. भाजपला तोंडावर पाडल्याच्या मोबदल्यात बंडखोर कलानी गटाच्या एकाही नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई होऊ न देण्याचा शब्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला. त्यापाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक निर्माण झाल्याचे चित्र उभे करून अखेर कलानी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली. 

राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत भाजप, रिपाइं आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षातील कलानी समर्थक २१ नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात पप्पू कलानी यांची मुलगी सीमा कलानी यांचाही समावेश होता. पप्पू कलानी यांची सून आणि ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांना राष्ट्रवादीने उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे बहाल केली. त्यासाठी राष्ट्रवादीने गुप्तपणे हालचाली केल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री उशिरा कलानी महल गाठले, त्याच वेळी हा पक्षप्रवेश निश्चित झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी उल्हासनगरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी यांना सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आणि त्या जागी पंचम कलानी यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली.

कलानी गटाचा प्रवास

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन टीम ओमी कलानी गटाची स्थापना.

त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक. त्या जोरावर पालिकेत प्रथमच भाजपचा महापौर.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्योती कलानी यांना तिकीट नाकारल्यापासून टीम ओमी कलानीत अस्वस्थता.

२०१९ च्या अखेरीस झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत टीम ओमी कलानी गटाच्या नऊ नगरसेवकांचे बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्या निवडणुकीतही भाजपचा पाडाव करण्याचे प्रयत्न.

बंडखोर नगरसेवकांना अपात्र ठरण्यापासून वाचवण्यात शिवसेनेने मोठी भूमिका बजावल्याची चर्चा.

काही दिवसांपूर्वी पप्पू कलानी यांना भाजपचे पक्षप्रवेशासाठी निमंत्रण. त्यावरून चर्चा सुरू असतानाच कलानी समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

गणेश नाईकांनाही आणखी धक्का?

नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही येत्या काही महिन्यांत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने गणेश नाईक व भाजपमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. ‘नवी मुंबईत यापूर्वीच अनेक धक्के दिले असून यापुढेही आणखी धक्के दिले जाणार आहे. उल्हासनगरचा पक्षप्रवेश हा ट्रेलर असून अजून चित्रपट बाकी आहे,’ असे सांगत आव्हाड यांनी त्याचे संकेत दिले.

ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असून या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी करूनच लढविणार आहेत. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नेते ‘एकला चलो रे’चा नारा देत आहेत. – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

काही नगरसेवक अनुपस्थित

२२ नगरसेवकांनी बुधवारी ठाण्यात  पक्षप्रवेश केला; परंतु यापैकी काही नगरसेवकांऐवजी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याबाबत विचारले असता, ‘कायदेशीर अडचणींमुळे काही नगरसेवकांना आम्हीच येऊ नका असे सांगितले,’ असे उत्तर आव्हाड यांनी दिले. या कार्यक्रमाला ओमी कलानीदेखील अनुपस्थित होते. मात्र, ‘ते आमच्यासोबतच आहेत’, असे त्यांच्या पत्नी पंचम कलानी यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mayoral election shiv sena bjp guardian minister eknath shinde minister of state for housing jitendra awhad pancham kalani akp

ताज्या बातम्या