२०१०मध्ये फक्त वीस लाखांची मालमत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच वर्षांपूर्वी अवघ्या काही लाखांची मालकीण असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या महापौर कल्याणी पाटील यांच्या संपत्तीत १३ ऑक्टोबर २०१५ पर्यंत तब्बल १ कोटी ३२ लाख ६ हजार ७९३ रुपयांनी वाढ झाली आहे.  मागील पाच वर्षांत कल्याणी पाटील कुटुंबीय १ कोटी ५२ लाख ६८ हजार ७९३ रुपयांचे धनी झाले आहेत.

साधे बँक खाते किंवा एक पैशाची गुंतवणूक नावावर नसताना महापौरांची मुलगी धनश्री, मुलगा धनराज यांनी पाच वर्षांत लक्षणीय आर्थिक प्रगती केली आहे. शिवसेनेच्या उमेदवार म्हणून कल्याणी पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या शपथपत्रात ही सांपत्तिक स्थितीची माहिती दिली आहे.

ऑक्टोबर २०१० मध्ये शिवसेनेच्या उमेदवार म्हणून कल्याणी पाटील यांनी कल्याण पूर्व भागातील जरीमरीनगर प्रभागातून निवडणूक लढवली. तत्कालीन निवडणूक अधिकारी जलसिंग वळवी यांच्यासमोर उमेदवारी अर्ज भरताना सत्य प्रतिज्ञापत्राद्वारे (शपथपत्र) कल्याणी पाटील यांनी कुटुंबातील संपत्तीचे एकूण विवरण दिले होते. त्यामध्ये कल्याणी यांच्या नावे बँक खात्यात एकूण १७ हजार रुपयांची रोख रक्कम होती. एलआयसीची १५ लाख रुपयांची पॉलिसी होती.

एकही मालमत्ता नव्हती

स्थावर, जंगम मालमत्तेचा एकही तुकडा पाटील यांच्या नावाने नव्हता. कल्याणी पाटील यांचे पती नितीन यांच्या बँक खात्यात एकूण ४५ हजार रुपयांची रोख रक्कम होती व ५ पाच लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी होती. चार चाकी वाहने पदरी होती. कल्याणी किंवा त्यांचे पती नितीन, मुलगी धनश्री (२३), मुलगा धनराज (१९) यांच्या नावे मागील पाच वर्षांत स्थावर, जंगम मालमत्तेचा एकही तुकडा नव्हता.

धनश्री, धनराज यांच्या नावावर एक पैशाची गुंतवणूक नसल्याची माहिती कल्याणी पाटील यांनी ऑक्टोबर २०१० च्या पालिका निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. असे एकूण २० लाख ६२ हजार रुपये संपत्तीचे पाटील कुटुंबीय पाच वर्षांपूर्वी मालक होते.

पाच वर्षांतील गोळा बेरीज

मागील पाच वर्षांत महापौर कल्याणी पाटील यांची संपत्ती १ कोटी ५२ लाख ६८ हजार ७९३ रुपये झाली आहे. या संपत्तीमधून मागील पाच वर्षांतील २० लाख ६२ हजार संपत्ती वजा केली तर कल्याणी पाटील यांच्या कुटुंबीयांनी या काळात १ कोटी ३२ लाख ६ हजार ७९३ रुपयांची संपत्ती जमविली आहे.

पाच वर्षांत काय झाले..

महापालिका निवडणुकीत दुर्गामाता मंदिर (प्र. क्र. ९२) प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून कल्याणी पाटील निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सत्य प्रतिज्ञापत्र सादर करून शपथपत्राद्वारे एकूण सांपत्तिक स्थितीची माहिती दिली आहे. यामध्ये कल्याणी यांचे शिक्षण बारावी कला, गेल्या वर्षी कल्याणी पाटील यांनी डी. टी. एड.(टीचर्स ट्रेनिंग महाविद्यालयाची) पदविका मिळवली आहे. त्या नोकरी करीत नाहीत.

’हॉटेल व्यवसायातून वार्षिक उत्पन्न ५ लाख २३ हजार ७१० रूपये .

’मुलगी धनश्रीचे उत्पन्न ३ लाख ८ हजार ८४५ रूपये, मालमत्ता २२ लाख १७ हजार ८२९ रूपये .

’ मुलगा धनराजची मालमत्ता २५ लाख ८१ हजार ९२४ रूपये .

’ दोन्ही मुलांची एकूण ४७ लाख ९९ हजार ७५३ रूपयांची कमाई.

’पती नितीन यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ६७२ रूपये, त्यांची एकूण मालमत्ता ३८ लाख ८६ हजार ८५१ रूपये, जंगम मालमत्ता ३४ लाख २३ हजार ९६२ रूपये.

’पाटील कुटुंबीयांकडे ७० तोळे सोने

’मागील बारा वर्षांपासून आपण प्राप्तिकर विवरणपत्र भरत असल्याचे महापौरांनी शपथपत्रात म्हटले आहे.

’ ही सगळी माहिती कल्याणी पाटील यांनी सत्य प्रतिज्ञापत्राद्वारे आताच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayors wealth increase
First published on: 23-10-2015 at 03:09 IST