ठाण्यातील तरुण अभियंत्याकडून विकसित; परिक्षेच्या माहितीसह सरावासाठी दररोज १० प्रश्न
व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमबीए-सीईटी) येत्या १२ मार्च रोजी पूर्व प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. काहीशी कठीण असणारी ही परीक्षा सोपी जावी या उद्देशाने ठाण्यातील एका अभियंता तरुणाने ‘साध्यम’ नावाने अ‍ॅप विकसित केले आहे. त्या परीक्षेसंबंधीच्या छोटय़ा क्लृप्त्या या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सर्व स्मार्ट, अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे.
ठाण्यातील केयूर केतकर या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या अभियंत्याने हे अ‍ॅप विकसित केले आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पूर्वपरीक्षा कठीण असते. त्यामुळे या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही मधला मार्ग शोधून काढावा हा विचार अनेक दिवसांपासून केयूरच्या मनात होता. तो प्रत्यक्ष कृतीत उतरविला आहे. ‘एमबीए-सीईटी’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५० मिनिटात २०० प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे ४ सेकंदात एक प्रश्न. हे प्रश्न सोडविताना केलेला अभ्यास, आलेले प्रश्न आणि ते सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेच्या बंधनात ही परीक्षा कशी द्यावी, याची माहिती देणारे एक अ‍ॅप विकसित केले. ‘निन्जा ऑनलाइन सव्‍‌र्हिसेस’ची या कामासाठी केयूरने मदत घेतली. सर्व प्रकारच्या स्मार्ट, अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर ‘साध्यम’ या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी व्यवस्थापन पूर्व परीक्षेसंबंधीच्या लहान लहान टिप्स मिळवू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेला येणारे संभाव्य प्रश्न कोणते असू शकतात, त्यांची तयारी कशी करायची, याची माहिती दररोज १० प्रश्न देऊन करण्यात येते. या प्रश्नांची तयारी विद्यार्थी स्मार्टफोनच्या माध्यमातून करू शकतात. परीक्षेच्या तयारीबाबत मोफत मार्गदर्शन अ‍ॅपच्या माध्यमातून मिळते. आपण किती अभ्यास केला आहे, या प्रगतीचा आढावा विद्यार्थी घेऊ शकतात, असे केयूरने सांगितले.
विद्यार्थीदशेत अभ्यास करीत असताना सुरुवातील आपण पुस्तक, मग गाईड आणि परीक्षा जवळ आली की विविध अपेक्षित प्रश्नसंचांचा आधार घेतो. त्या पद्धतीने असे ऑनलाइन साधन उपलब्ध केले तर, असा विचार करीत असताना आपणास ही ‘स्मार्ट अ‍ॅप’ची कल्पना सुचली, असे केयूर केतकर याने सांगितले. अशा प्रकारची अन्य अभ्यासक्रमांसंदर्भात काही अ‍ॅप्स विकसित करण्याचा मानस असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mba entrance exam to practice on mobile app
First published on: 25-02-2016 at 01:04 IST