डोंबिवली – रशियात एम. बी. बी. एस. शिक्षणासाठी ओरन बर्ग स्टेट मेडिकल विद्यापीठात प्रवेश करून देतो, असे एक विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांना सांगून त्यांच्याकडून शैक्षणिक प्रवेशासाठी २३ लाख आठ हजार ६१७ रूपये डोंबिवलीतील स्टडी हब पॅलेसचे डाॅक्टर असलेल्या चार जणांनी वसूल केले. या रकमेतील सात लाख ६९ हजार ५३८ रूपये रक्कम रशियातील विद्यापीठात संचालकांनी भरणा केली. उर्वरित १५ लाख ३९ हजाराची रक्कम स्टडी हबच्या संचालकांनी भरणा केली नाही. त्यामुळे त्यांनी या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार विद्यार्थ्याच्या पालकाने रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
संदेश विलास फडतरे असे तक्रारदाराचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील डी. एन. सी. शाळा रस्त्यावरील प्रगती महाविद्यालय परिसरातील एका गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहतात. संदेश फडतरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डाॅ. आशीष पत्रा, स्टडी हब पॅलेसचे संचालक डाॅ. शुभम, डाॅ. राकेश सिंग, डाॅ. मयांक राज यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६, ३४ प्रमाणे सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
संदेश फडतरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की माझ्या मुलाला रशियातील विद्यापीठात एम. बी. बी. एस. शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. यासाठी आम्ही काही ठिकाणी चौकशी सुरू केली होती. अशाच चौकशीतून आमचा संपर्क डाॅ. आशीष पत्रा यांच्याशी आला. त्यांच्या मार्फत आम्ही स्टडी हब पॅलेसचे संचालक डाॅ. शुभम, डाॅ. राकेश सिंग, डाॅ. मयांंक राज यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तक्रारदार संदेश फडतरे आणि त्यांच्या मुलाचा विश्वास संपादन केला आणि आम्ही तु्म्हाला रशियातील रशियातील ओरन बर्ग स्टेट मेडिकल विद्यापीठात एम. बी. बी. एस. शिक्षणासाठी सहा वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन देतो असे सांगितले.
या प्रवेश प्रक्रियेसाठी फडतरे यांनी स्टडी हब पॅलेस संचालकांच्या बँक खात्यावर अमेरिकन डाॅलरप्रमाणे एकूण २३ लाख आठ हजार ६१७ रूपये जमा केले. ही प्रवेश शुल्क रक्कम संचालकांनी रशियातील विद्यापीठात भरणा करून फडतरे यांच्या मुलाची एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, या संचालक डाॅक्टरांनी एकूण रकमेतील सात लाख ६९ हजार ५३८ रूपये रशियातील ओरन बर्ग स्टेट मेडिकल विद्यापीठात भरणा केले.
उर्वरित १५ लाख ३९ हजार ७७ रूपयांची रक्कम भरणा केली नाही. ही रक्कम भरणा करावी म्हणून तगादा लावूनही ती रक्कम भरणा न केल्याने आपली फसवणूक या चार संचालकांनी केली म्हणून संदेश फडतरे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.
