मीरा-भाईंदरचे फेरीवाले आता ‘स्मार्ट’ | Loksatta

मीरा-भाईंदरचे फेरीवाले आता ‘स्मार्ट’

नियमावली तयार झाली की महापालिकांना आपल्या क्षेत्रात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाने द्यायचे आहेत.

मीरा-भाईंदरचे फेरीवाले आता ‘स्मार्ट’
मीरा-भाईंदर महानगरपालिका

महानगरपालिकेकडून स्मार्ट कार्ड मिळणार
कुठेही आणि कोणत्याही पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर आता महापालिकेकडून स्मार्ट नजर ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महापालिकेकडून शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून या सर्वेक्षणानंतर प्रत्येक फेरीवाल्याला स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमध्ये संबंधित फेरीवाल्याचा संपूर्ण तपशील, त्याचे व्यवसायाचे ठिकाण आदी इत्थंभूत माहिती साठविण्यात आली असल्याने त्याच्यावर नजर ठेवणे पालिकेला शक्य होणार आहे. फेरीवाल्यांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट कार्ड देणारी मीरा-भाईंदर ही एकमेव महापालिका आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना फेरीवाला धोरण ठरवायचे आदेश दिल्यानंतर त्याची नियमावली तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. नियमावली तयार झाली की महापालिकांना आपल्या क्षेत्रात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाने द्यायचे आहेत. या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘सार आयटी रिसोर्स’ या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. हा कंत्राटदार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाने द्यायचे काम करणार आहे. मात्र मीरा-भाईंदरमधील फेरीवाल्यांना देण्यात येणारे परवाने हे इतर महापालिकांपेक्षा वेगळे असणार आहेत. फेरीवाल्यांना स्मार्ट कार्डच्या स्वरूपात हे परवाने देण्यात येणार आहेत.

सर्वेक्षण करताना प्रत्येक फेरीवाल्याच्या जागी जाऊन त्यांच्या अंगठय़ाचे ठसे व जागेवरच छायाचित्र घेण्यात येणार आहेत. शासनाने नियमावली तयार केली की लगेचच फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असून हे सर्वेक्षण कार्यादेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली असून स्मार्ट कार्डमुळे फेरीवाल्यांमध्ये शिस्तबद्धता व पारदर्शकता येणार आहे.
– दीपक कुरळेकर, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका.

स्मार्ट कार्डचे वैशिष्टय़े
’ स्मार्ट कार्डमध्ये फेरीवाल्याचे नाव, पत्ता, छायाचित्र, मोबाइल क्रमांक आदी माहितीसह तो ज्या जागेवर व्यवसाय करत आहे, त्या जागेचे जीपीएस लोकेशन नमूद करण्यात येणार आहे.
’ जीपीएस लोकेशनमुळे संबंधित फेरीवाल्याला त्याला नेमून देण्यात आलेल्या जागेवरच व्यवसाय करणे बंधनकारक आहे.
’ फेरीवाल्याची तपासणी करताना अधिकाऱ्यांना त्याचे स्मार्ट कार्ड यंत्राद्वारे तपासता येणार आहे आणि त्यावरून तो योग्य ठिकाणी व्यवसाय करत आहे किंवा नाही याची सहजपणे पडताळणी करता येणार आहे.
’ एका जागी न बसता फिरता व्यवसाय करणाऱ्यांनाही विशिष्ट परिसर नेमून दिला जाणार असून तसा स्पष्ट उल्लेख त्याच्या स्मार्ट कार्डवर नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ त्याच परिसरातच व्यवसाय करता येणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2016 at 04:28 IST
Next Story
शाळेच्या बाकावरून : विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे