घरात अळ्या आढळ्यास कारवाईचा इशारा

भाईंदर : करोनाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आजाराचा फैलाव वाढू नये म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिका आक्रमक झाली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे डेंग्यूचा फैलाव होत असणाऱ्या भागात आता पालिका कडक कारवाई करणार असल्याची माहिती वैद्यकीय विभाग उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिली आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोना रुग्णांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता पालिका शर्तीचे प्रयत्न करत आहेत. परंतु यांसह डेंग्यू आजाराचे रुग्णही आपले डोके वर काढत असल्यामुळे पालिका प्रशासन करोनासह डेंग्यूविरोधात आक्रमक झाली आहे. यंदा मीरा-भाईंदर महापालिकेकडून वैद्यकीय विभागामार्फत मार्च २०२० मध्ये ५४ लाख ९० हजार रुपयांची डासनाशके आणि अळीनाशके खरेदी करण्यात आली आहेत.

डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने पाण्याच्या साठवणीची ठिकाणे डासांची सापडण्याची प्रमुख ठिकाणे आहेत. घरात पाण्याची साठवण असणाऱ्या टाक्या, झाडाच्या कुंडय़ाच्या खाली जमा होणारे पाणी, वातानुकलित यंत्रणेतून साठवलेले पाणी आणि भंगार वस्तूमध्ये जमा होणारे पाणी यात डेंग्यूच्या अळ्या आढळतात. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

खबरदारी न घेतल्यास कारवाई

आरोग्य विभागाच्या पथकाला अनेक ठिकाणाच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळी सापडत आहेत. मुंबई महापालिकेकडून डासांच्या अळी सापडल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिकेकडूनही कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. घरात डासांच्या अळ्या आढळल्यास त्यांना पालिकेकडुन नोटीस बजावण्यात येईल. तरीदेखील खबरदारी न घेतल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक भागात तक्रारी कायम

महापालिकेत एकूण २४ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात दैनंदिन औषध फवारणी कृती आराखडय़ानुसार औषध फवारणी कर्मचाऱ्यांद्वारे स्प्रे-पंपाने आठवडय़ातून एकदा तसेच टेम्पोवरील जेट स्प्रे यंत्राद्वारे पंधरा दिवसांतून एकदा डासनाशके, अळीनाशके यांची फवारणी केली जाते, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात फवारणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला .